ही खेळी आईला समर्पित : गेल
By admin | Published: April 13, 2015 03:33 AM2015-04-13T03:33:38+5:302015-04-13T03:33:38+5:30
आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करताना शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध
कोलकाता : आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करताना शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केलेली ९६ धावांची आक्रमक खेळी आपल्या आईला समर्पित केली. गेलच्या आईचा आज वाढदिवस आहे.
आरसीबी संघाने तीन गडी राखून विजय मिळविल्यानंतर गेल म्हणाला,‘उभय संघांनी आज चांगला खेळ केला. मी माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. ती ही लढत बघत असेल, अशी आशा आहे. ही खेळी तुझ्यासाठी होती, आई.’ हर्षल पटेलसोबतची भागीदारी आणि मोर्ने मोर्कलने सोडलेला झेल सामन्याचा टर्निग पॉर्इंट ठरला, असेही सामनावीर पुरस्काराचा मानकरी गेल म्हणाला.
गेलने सांगितले की,‘आमचे फलंदाज बाद होत असताना एबी डिव्हिलियर्सने धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न केला असता तोही बाद झाला. त्यामुळे पटेलसोबतची भागीदारी आणि मला लाभलेले जीवदान सामन्याचा टर्निंग पॉर्इंट ठरले. पटेलला नारायणच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा सल्ला दिला होता. सुरुवातीला तो अपयशी ठरला, पण मी त्याला पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला यश मिळाले.’ (वृत्तसंस्था)