सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक : गोपीचंद

By admin | Published: October 24, 2016 04:19 AM2016-10-24T04:19:37+5:302016-10-24T04:19:37+5:30

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक असते, असे मत माजी दिग्गज बॅडमिंटनपटू व आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावित इतिहास

Dedication is required at all levels: Gopichand | सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक : गोपीचंद

सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक : गोपीचंद

Next

नागपूर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक असते, असे मत माजी दिग्गज बॅडमिंटनपटू व आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावित इतिहास घडविणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे मार्गदर्शक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. रविवारी आयोजित एसजेएएन-रायसोनी अचिव्हर्स वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून ते नागपुरात आले होते. त्या वेळी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
सन २००१मध्ये आॅल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावित प्रकाश पदुकोणनंतर अशी कामगिरी
करणारे दुसरे भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेले गोपीचंद म्हणाले, ‘‘खेळाडू घडविणे सोपे नसते. यश मिळवण्यासाठी सर्व स्तरांतून समर्पण असणे आवश्यक असते. खेळाडू, प्रशिक्षक, पालक या सर्वांच्या समर्पणासोबत परमेश्वराची कृपा असणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास पी. व्ही. सिंधूच्या आईने रेल्वेतील नोकरीचा त्याग केला आणि आॅलिम्पिकपूर्वी तिच्या वडिलांनी मुलीच्या मदतीसाठी दोन महिन्यांची रजा घेतली.’’
गोपीचंद यांनी सांगितले, ‘‘भारतात प्रतिभेची वानवा नाही. खेळाडूंना सुविधा मिळाल्या आणि त्यांनी मेहनत घेतली तर अनुकूल निकाल मिळवता येतील.’’
हैदराबादमध्ये विश्व दर्जाची अकादमी चालविणारे गोपीचंद पुढे म्हणाले, ‘‘२००८पासून भारताचा बॅडमिंटनचा आलेख सतत उंचावत आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये खेळाडू चांगले निकाल देत आहेत. सिंधूने आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकाविल्यानंतर भारतीय बॅडमिंटनचे चित्र पालटण्यास मदत झाली आहे. सध्या भारतीय बॅडमिंटन चांगल्या स्तरावर आहे.’’
पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी गोपीचंद यांनी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रशंसा करताना सांगितले, ‘‘दर्जेदार खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी तळागाळातील खेळाडूंसाठी काही योजना राबविणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सातत्याने खेळांवर बोलत असतात. त्यांचा क्रीडा क्षेत्रात चांगला प्रभाव पडला. खेळाच्या विकासासाठी काही चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. काही कॉर्पोरेट खेळाच्या विकासासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत असून, हे चांगले चित्र आहे.’’
विदेशी प्रशिक्षकाच्या मुद्यावर बोलताना गोपीचंद म्हणाले, ‘‘विदेशी प्रशिक्षकांसाठी काही मापदंड ठेवण्यात आलेले नाहीत. दीर्घ काळाचा विचार करता देशातच दर्जेदार प्रशिक्षक घडविणे आवश्यक आहे.’’ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Dedication is required at all levels: Gopichand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.