दीपा मलिक यांच्या रौप्यपदकाने नगरमध्ये जल्लोष
By admin | Published: September 14, 2016 05:08 AM2016-09-14T05:08:20+5:302016-09-14T05:08:20+5:30
रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या दीपा मलिक यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या भिंगार येथील राहत्या घरी जल्लोष झाला.
सुदाम देशमुख/अनिल साठे , अहमदनगर
रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या दीपा मलिक यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या भिंगार येथील राहत्या घरी जल्लोष झाला. सोशल मीडियावरूनही मलिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. मलिक यांच्या कामगिरीमुळे अहमदनगरचे नाव पुन्हा एकदा क्रीडाविश्वात झळकल्याने नगरमध्ये चैतन्य संचारले आहे.
पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या मलिक या भारताच्या पहिल्या महिला ठरल्या असून, त्या अहमदनगरच्या रहिवासी असल्याचा आनंद नगरिकांना झाला आहे. दीपा मलिक यांचे वडील बिक्रमसिंह हे नगर येथील मिलिटरीमध्ये होते. निवृत्त झाल्यानंतर ते भिंगारला स्थायिक झाले. मलिक यांना बालपणापासूनच खेळाची आवड आहे. त्यांना हे पदक मिळाल्याचे समजताच नगर, छावणी मंडळ परिसरात एकच जल्लोष सुरू झाला.
सासर व माहेरची मंडळी देशसेवेत
दीपा यांचे वडील बालकिशन नागपाल व सासरे मे.जन. बी. एस. मलिक यांनी लष्करात देशसेवा केली आहे. अन्य नातेवाईक लष्करात मोठ्या हुद्द्यावर आहेत. सर्वांची प्रेरणा व दीपा यांची जिद्द, कोच बाबर यांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्या पदकापर्यंत पोहोचू शकल्या आहेत. सूनबाईने देशाच्या लौकिकास साजेसा खेळ केला आहे, याचा अभिमान वाटतो.
- सत्या मलिक, दीपा मलिक यांच्या सासू
अपंग खेळाडूंना प्रशिक्षण देताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. लष्करातील विविध स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. सौंदर्य स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. अशी खेळाडू माझी शिष्या असल्याचा मोठा अभिमान आहे. रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये रौप्यपदक मिळवल्याने आनंद झाला आहे. भारतामध्ये दाखल झाल्यावर नगर शहरात मोठे जंगी स्वागत करून सत्कार करणार आहे.
- रावसाहेब बाबर, प्रशिक्षक
अपंगत्व तरीही जिद्द...
मूळच्या राजस्थानच्या रहिवासी असलेल्या दीपा मलिक यांना शालेय जीवनात बास्केटबॉलची विशेष रुची होती. शालेय जीवनात सुरू झालेली पदकांची लयलूट अपंगत्व येऊनही तशीच सुरू ठेवत पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू म्हणून त्यांनी मान मिळविला आहे. अहमदनगर जवळील भिंगारमधील वैद्य कॉलनीमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. बाळंतपणात पाठीला आलेल्या ट्युमरच्या आजारात तीन वेळा शस्रक्रिया झाली. त्यात चुकीच्या औषधोपचारामुळे कमरेपासून खालील भागाच्या संवेदना गेल्या होत्या. याच दरम्यान त्यांचे पती कर्नल विक्रांत मलिक हे लष्करात होते.
कारगिल युद्धात ते कर्तव्य करीत होते. दीपा यांची माहिती मिळताच युद्धानंतर वरिष्ठांनी त्यांना रजा मंजूर केली होती. मलिक यांचे खचलेले धैर्य पाहून त्यांनी नव्या उमेदीने सराव करण्यास प्रोत्साहन दिले. पत्नीला आलेले अपंगत्व व खेळाची आवड पाहून विक्रांत यांनी लष्कर सेवेचा राजीनामा दिला होता. २००५ साली त्यांनी गोळाफेक सरावाला सुरुवात केली होती. त्यांना प्रशिक्षक रावसाहेब बाबर यांचे मार्गदर्शन लाभले. भालाफेकमध्ये त्यांनी आशियाई स्पर्धेत कांस्य, तर विश्व चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती, तर भारत सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.