दीपिका कुमारीकडून विश्वविक्रमाची बरोबरी
By admin | Published: April 27, 2016 08:36 PM2016-04-27T20:36:08+5:302016-04-27T20:36:08+5:30
भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकण्यासोबतच महिला रिकर्व्ह प्रकारात विश्वविक्रमाशी बरोबरी साधली.
शांघाय : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकण्यासोबतच महिला रिकर्व्ह प्रकारात विश्वविक्रमाशी बरोबरी साधली.
जागतिक तिरंदाजी क्रमवारीत माजी अव्वल खेळाडू राहिलेल्या दीपिकाने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णांची कमाई केली होती. तिने आज ७२ नेम साधताना ६८६ गुण संपादन करीत लंडन आॅलिम्पिकची सुवर्ण विजेती कोरियाची किबो बाई हिच्या विक्रमाशी बरोबरी केली. किबो बाईने लंडन आॅलिम्पिकमध्ये वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात दोन सुवर्ण जिंकले होते. २०१५ साली तिने ग्वांगझृ येथे आपलीच सहकारी पार्क सूंग हून हिचा ११ वर्षे जुना ६८२ गुणांचा जुना विश्वविक्रम मोडीत काढला होता.
दीपिकाने पहिल्या टप्प्यात ३४६ गुणांची कमाई करीत आश्चर्याचा धक्का दिला. कोरियाच्या खेळाडूचा विक्रम मोडीत काढण्यासाठी आणखी नऊ गुणांची गरज होती; पण दीपिकाला ही कामगिरी मात्र करता आली नाही. अव्वल मानांकित दीपिकाला आत थेट ३२ खेळाडूंमध्ये तिसरी फेरी खेळण्याची संधी मिळणार आहे.
लक्ष्मीराणी मांझी आणि रिमिल बुरुली या दोन्ही भारतीय खेळाडू पहिल्या फेरीपासून सुरुवात करतील. भारतीय महिला संघाला स्पर्धेत चौथे मानांकन मिळाले आहे. मिश्र प्रकारात दीपिकाने अतनू दाससोबत तुर्कीच्या जोडीला ५-३ ने पराभूत केले. पण, उपांत्य फेरीत भारतीय जोडी चायनीज तैैपेईकडून ३-५ ने पराभूत झाली. आता कांस्यपदकासाठी ही जोडी लढत देणार आहे. कोरिया संघ दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अमेरिकेकडून ०-६ ने पराभूत झाला. पुरुष रिकर्व्ह पात्रता फेरीत अतनू दास, जयंत तालुकदार आणि मंगलसिंग चम्पिया यांनी तिसरे स्थान मिळविले.(वृत्तसंस्था)