निराशाजनक कामगिरीमुळे पराभव

By admin | Published: July 4, 2017 01:52 AM2017-07-04T01:52:42+5:302017-07-04T01:52:42+5:30

खेळपट्टी संथ होती आणि फटकेबाजी करणे सोपे नव्हते, हे जरी खरे असले तरी फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे चौथ्या

Defeat by the disappointing performance | निराशाजनक कामगिरीमुळे पराभव

निराशाजनक कामगिरीमुळे पराभव

Next

अँटिग्वा : खेळपट्टी संथ होती आणि फटकेबाजी करणे सोपे नव्हते, हे जरी खरे असले तरी फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे चौथ्या वन-डे लढतीत संघाला पराभव स्वीकारावा लागला, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केली.
भारतापुढे विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य होते, पण अँटिग्वाच्या खडतर खेळपट्टीवर भारतीय संघ १७८ धावांत गारद झाला. भारतीय संघाला ११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बांगर म्हणाले, ‘खेळपट्टी संथ होत गेली. येथे फटके लगावणे सोपे नव्हते. येथे अशाच स्वरूपाच्या खेळपट्ट्या बघायला मिळाल्या, पण वास्तविक बघता आम्ही क्षमतेनुसार फलंदाजी केली नाही. लक्ष्य गाठणे शक्य होते. माझ्या मते फलंदाजांच्या अपयशामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वीच्या लढतीतही आम्हाला अशीच खेळपट्टी अनुभवायला मिळाली होती. त्या वेळी आम्ही पहिल्या १० षटकांमध्ये दोन विकेट गमावल्या होत्या, पण तरी आम्ही तेथे अडीचशे धावांचा पल्ला गाठण्यात यशस्वी ठरलो होतो.’
बांगर यांनी सांगितले, ‘‘विजयाचे श्रेय विंडीज संघाला मिळायलाच हवे. त्यांनी योजनाबद्ध खेळ केला.’’
अजिंक्य रहाणेने ९१ चेंडूंना सामोरे जाताना ६०, तर महेंद्रसिंह धोनीने ११४ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. बांगर यांनी मात्र अन्य खेळाडूंप्रमाणे धोनीचीही पाठराखण केली. संथ फलंदाजीसाठी धोनीवर टीका होत आहे.
दरम्यान, बांगर यांनी गोलंदाजांची प्रशंसा केली. बांगर म्हणाले, ‘‘मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सराव सामन्यात खेळला होता. त्या वेळी त्याने दोन बळी घेतले होते. त्याने या लढतीतही लयबद्ध मारा केला. उमेश व कुलदीप यादव यांनी चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजांनी नक्कीच चांगली कामगिरी केली, पण आज आमचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले.’’
बांगर यांनी युवराजसिंगची पाठराखण करताना सांगितले, ‘‘युवराजने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना काही सामने जिंकून दिले आहेत. स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला चौथ्या लढतीत खेळता आले नाही. आमच्याकडे चौथ्या स्थानासाठी बरेच पर्याय आहेत.’’ (वृत्तसंस्था)

मधल्या षटकांत विकेट गमावल्याने बॅकफूटवर

बांगर म्हणाले, ‘‘कुणीतरी शेवटपर्यंत एक टोक सांभाळावे, अशी आमची रणनीती होती. अजिंक्यने बाद होण्यापूर्वी ही भूमिका बजावली. ज्या वेळी आम्ही चांगल्या स्थितीत होतो, त्या वेळी आम्ही एकापाठोपाठ दोन विकेट गमावल्या. मधल्या षटकांमध्ये विकेट गमावल्यामुळे आम्ही बॅकफूटवर गेलो. त्यानंतर आवश्यक धावगती वाढत गेली.
केदार सहाव्या, तर हार्दिक सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतात. त्यांच्यावर दडपण झुगारून संघाला विजयी लक्ष्य गाठून देण्याची जबाबदारी असते. या लढतीतून त्यांना बरेच काही शिकायला मिळेल. हार्दिक व जडेजा बाद झाले त्या वेळीही आम्हाला विजयासाठी प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचे लक्ष्य होते.
अशा परिस्थितीमध्ये फटक्यांची अचूक निवड करणे आवश्यक असते. त्यात भारतीय फलंदाजांनी चूक केली. तुम्हाला परिस्थितीनुरुप खेळ करावा लागतो. धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजी करीत आहे.
भारतीय संघात सहाव्या, सातव्या व आठव्या
क्रमांकावरही चांगले फलंदाज आहेत, पण ज्या वेळी हे फलंदाज अपयशी ठरतात त्या वेळी धोनीला नैसर्गिक फलंदाजी करणे शक्य नसते.
दुसऱ्या टोकावरील फलंदाज कशी फलंदाजी करतो आणि आपल्याकडे किती विकेट शिल्लक आहेत, हे बघणे महत्त्वाचे ठरते.’


फटक्यांची निवड अपेक्षेनुरूप नव्हती : कोहली

अ‍ॅन्टिग्वा : फलंदाजांची फटक्यांची निवड अचूक नव्हती, त्यामुळे आम्हाला विंडीजविरुद्ध रविवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे लढतीत पराभव स्वीकारावा लागला, अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

लढतीनंतर बोलताना कोहली म्हणाला, ‘आमची फटक्यांची निवड अपेक्षेनुरूप नव्हती. आम्ही मोक्याच्या क्षणी महत्त्वाचे बळी गमावले. सामन्यात लय कायम राखणे आवश्यक असते. विजयाचे श्रेय विंडीजच्या गोलंदाजांना द्यायला हवे. त्यांनी डॉट चेंडू टाकताना आम्हाला चुका करण्यास बाध्य केले. या व्यतिरिक्त खेळपट्टीमध्ये अतिरिक्त काही असेल, असे मला वाटत नाही.’

विराटने विंडीजला १८९ धावांत रोखण्याची कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांची प्रशंसा केली. विराट म्हणाला, ‘आम्ही अचूक मारा करीत विंडीज संघाला १८९ धावांत रोखले. गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि क्षेत्ररक्षकांचीही योग्य साथ लाभली. फलंदाजीमध्ये मात्र आम्ही ढेपाळलो. आम्ही हे विसरून पुढच्या लढतीसाठी सज्ज होण्यावर लक्ष केंद्रित करणार आहो.’ विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर विजयामुळे आनंदी होता. होल्डर म्हणाला, ‘खेळाडूंच्या कामगिरीमुळे खूष आहे. विजयाचे श्रेय सर्व गोलंदाजांना मिळायला हवे. त्यांना क्षेत्ररक्षकांची योग्य साथ लाभली. भारताला पराभूत करण्याची क्षमता असल्याची आम्हाला कल्पना होती. केवळ थोडे अतिरिक्त प्रयत्न करणे आवश्यक होते.’

Web Title: Defeat by the disappointing performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.