चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोलंदाज ठरणार निर्णायक

By admin | Published: May 30, 2017 12:57 AM2017-05-30T00:57:04+5:302017-05-30T00:57:04+5:30

काही दिवसांमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. भारत या स्पर्धेत गतविजेता असून पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवले

Defending champions in the Champions Trophy | चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोलंदाज ठरणार निर्णायक

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोलंदाज ठरणार निर्णायक

Next

काही दिवसांमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. भारत या स्पर्धेत गतविजेता असून पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवले. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे जरी भारताने विजय मिळवला असला तरी,
माझ्या मते हा चांगला विजय ठरला. कारण, एक तर हा सराव सामना होता, त्यात न्यूझीलंडसारख्या संघाला १८९ धावांमध्ये बाद करणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. भारत विजयापासून ६० धावा दूर असताना पावसाने हजेरी लावली आणि जास्त बळीही गमावले नव्हते. सर्वांत चांगली बाब म्हणजे विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले.
कोहलीला आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेत फार काही चमक दाखवता आली नव्हती. तसेच, त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्येही लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. अशा घडामोडीनंतर पहिल्याच सामन्यात जर कोहली धावा काढत असेल, तर स्वत:सह संघाचाही आत्मविश्वास वाढतो. तसेच कोहलीसारखा मोठा खेळाडू फॉर्ममध्ये आल्यानंतर प्रतिस्पर्धी संघावर खूप मोठा परिणाम होतो. पण एकूणच कामगिरी पाहिल्यास सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, भारताची गोलंदाजी जबरदस्त झाली. ५ वेगवान गोलंदाज, २ फिरकी गोलंदाज असा ताफा असलेल्या भारतीय संघाचे जवळपास सर्वच गोलंदाज यशस्वी ठरले. महंमद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार या प्रमुख गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे गोलंदाज भारतासाठी खूप निर्णायक ठरेल, असे मला वाटते.
गोलंदाजी यासाठी निर्णायक ठरेल, कारण विदेशात जिंकलेल्या गेल्या तीन एकदिवसीय विजेतेपदांची कामगिरी पाहिल्यास कळेल, की गोलंदाजांमुळे टीम इंडिया यशस्वी झाली आहे. १९८३ चा विश्वचषक कपिलदेवच्या नेतृत्वामध्ये जिंकला, तेव्हा सर्वांना कपिलच्या नाबाद १७५ धावांची खेळी आठवते. पण आपण हे विसरतो, की अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजला ४० धावांनी नमवले. १८३ सारख्या छोट्या धावसंख्येचे भारतीयांनी यशस्वी संरक्षण केले होते. गोलंदाजांनी तेथे यश मिळवले होते. मदनलाल, कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, रॉजर बिन्नी यांसारख्या गोलंदाजांनी बाजी मारली.
यानंतर, १९८५ मध्ये वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये जर तुम्ही पाहिले तर कळेल, तिथेही गोलंदाज चमकले होते. विश्वचषकविजेत्या गोलंदाजांसोबत चेतन शर्मा, शिवरामकृष्णन, रवी शास्त्री यांची भर पडली होती. या गोलंदाजांच्या जोरावर भारताने अंतिम सामना जिंकला होता. यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील भारताने गोलंदाजांच्या जोरावरच जिंकली होती. ५ सामन्यांत ५० पैकी ४५ बळी मिळवण्यात भारताला यश आले होते. यावरुनच गोलंदाजांचे यश लक्षात येते. कारण, विदेशी वातावरण असे असते जेथे गोलंदाजांना खूप मदत मिळते. त्यामुळे गोलंदाजीमध्ये विविधता, चांगले पर्याय असणे खूप महत्त्वाचे ठरते. तसेच, गोलंदाजांची कामगिरीही चांगली होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मला वाटते, या वेळी निवडकर्त्यांनी खूप चांगले काम केले आहे. सध्याच्या भारतीय संघात गोलंदाजीसाठी अनेक पर्याय असून आपले गोलंदाज चांगल्या लयीमध्ये आहेत.

- अयाझ मेमन -
(संपादकीय सल्लागार) 

Web Title: Defending champions in the Champions Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.