अंतिम १६ मधील फ्रान्सचे स्थान निश्चित

By Admin | Published: June 17, 2016 05:29 AM2016-06-17T05:29:12+5:302016-06-17T05:29:12+5:30

अल्बानियन खेळाडूंनी अत्यंत ताकदीने केलेला बचाव शेवटच्या क्षणी कमजोर पडल्याचा फायदा घेत फ्रान्सच्या खेळाडूंनी दोन गोल ठोकून अल्बानियावर २-० अशी मात केली.

Definition of the French in the last 16 | अंतिम १६ मधील फ्रान्सचे स्थान निश्चित

अंतिम १६ मधील फ्रान्सचे स्थान निश्चित

googlenewsNext

पॅरिस : अल्बानियन खेळाडूंनी अत्यंत ताकदीने केलेला बचाव शेवटच्या क्षणी कमजोर पडल्याचा फायदा घेत फ्रान्सच्या खेळाडूंनी दोन गोल ठोकून अल्बानियावर २-० अशी मात केली. या विजयाने यजमान फ्रान्सने अंतिम १६ संघाच्या फेरीत प्रवेश नक्की केला.
यजमान फ्रान्सने सलामीच्या सामन्यात रोमानियाला हरवले होते. बुधवारी झालेल्या त्यांच्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ केला. यामुळे हा सामना गोलशून्य बरोबरीत संपेल, असे वाटत होते. पण, इंज्युरी टाईममध्ये अँटोनी ग्रीजमन आणि दिमित्री यांनी पाठोपाठ गोल नोंदवत फ्रान्सच्या चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली.
ग्रीजमनने ९० व्या मिनिटाला हेडर नोंदवून फ्रान्सला पहिली सफलता मिळवून दिली. त्यानंतर दिमित्रीने अल्बानियाच्या सुरक्षाफळीला भेदून निर्णायक आघाडी घेतली. पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे फ्रान्सचा बाद फेरीतील प्रवेश नक्की झाला आहे. (वृत्तसंस्था)

इंग्लंडचा वेल्सला दणका
लेन्स : अतिरिक्त वेळेच्या पहिल्याच मिनिटामध्ये डॅनियल स्टरीज याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर इंग्लंडने युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या ‘बॅटल आॅफ ब्रिटन क्लॅश’ सामन्यात वेल्स संघाला २-१ असे पराभूत केले.
अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मध्यंतराच्या काही मिनिटांअगोदर मिळालेली फ्री किक सत्कारणी लावताना गॅरेथ बेल याने ४२व्या मिनिटाला वेल्सला आश्चर्यकारकरीत्या १-० असे आघाडीवर नेले. यानंतर वेल्सने भक्कम बचाव करताना मध्यंतराला १-० असे वर्चस्व राखले. मध्यंतरानंतर मात्र इंग्लंडने अपेक्षेनुसार आक्रमक खेळ करताना वेल्सला गाठण्याच्या प्रयत्न केला. इंग्लंडने बदली खेळाडू म्हणून जेमी वर्डी आणि स्टरीज यांना मैदानात उतरवले. या दोघांनी निर्णायक आक्रमक खेळ करताना आपल्या प्रशिक्षकांचा निर्णय सार्थ ठरवला. मध्यंतरानंतर लगेच या दोघांनीही वेल्सच्या गोलजाळ्यावर हल्ला करताना आपला इरादा स्पष्ट केला.
५६व्या मिनिटाला इंग्लंडने वेल्सच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली आणि यावेळी वर्डीने मिळालेल्या संधीचा फायदा उचलताना महत्त्वपूर्ण गोल करुन संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. या गोलमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या इंग्लंडने अधिक आक्रमक खेळ करताना वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेल्सच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. निर्धारीत वेळेतही बरोबरी कायम राहिल्यानंतर ३ मिनिटांचा अतिरीक्त वेळ देण्यात आला. यावेळी पहिल्याच मिनिटामध्ये स्टरीजने डेले अलीच्या पासवर निर्णायक गोल करताना इंग्लंडला २-१ असे आघाडीवर नेत वेल्सच्या आव्हानातली हवा काढली. यानंतर हीच आघाडी कायम राखून इंग्लंडने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

उत्तर आयर्लंडचा दमदार विजय
लिआॅन : आजपर्यंत युक्रेनविरुद्ध कधीही विजयी न झालेल्या उत्तर आयर्लंडने युरो कप स्पर्धेतील विजयी कूच कायम राखताना २-० अशी शानदार बाजी मारली. उत्तर आयर्लंड व युक्रेन यांच्यात आतापर्यंत ४ सामने झाले असून यापैकी २ सामन्यात युक्रेनने बाजी मारली असून २ सामने बरोबरीत सुटले.
उत्कृष्ट बचाव आणि दमदार आक्रमण या जोरावर उत्तर आयर्लंडने युक्रेनला सामन्यात फारशी संधी दिली नाही. पहिल्या डावात दोन्ही संघांनी बचावामध्ये चांगले प्रदर्शन करताना मध्यंतराला गोलशुन्य बरोबरी साधली. विश्रांतीनंतर मात्र उत्तर आयर्लंडने जबरदस्त हल्ला चढवला. युक्रेनच्या क्षेत्रात मुसंडी मारलेल्या उत्तर आयर्लंडच्या गॅरेथ मॅकआॅले याने डाव्या कोपऱ्यातून अप्रतिम हेडर मारत संघाला १-० असे आघाडीवर नेले.उत्तर आयर्लंड एका गोलच्या फरकाने विजय मिळवणार असे दिसत असताना अतिरीक्त वेळेच्या सहाव्या मिनिटाला नीआॅल मॅकगीन याने चमकदार गोल करताना उत्तर आयर्लंडच्या २-० अशा शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Definition of the French in the last 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.