दिल्लीचा हैदराबादला धक्का, 6 विकेटने केला पराभव
By Admin | Published: May 2, 2017 11:37 PM2017-05-02T23:37:56+5:302017-05-03T00:48:41+5:30
गोलंदाजी आणि फलंदाजी तगड्या असलेल्या हैदराबादला दिल्लीने पराभवाचा धक्का दिला आणि तडाखेबाज फलंदाजी करणा-या युवराज सिंग
नवी दिल्ली : फलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना बलाढ्य सनरायझर्स हैदराबादचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत ३ बाद १८५ धावांची मजल मारल्यानंतर दिल्लीने १९.१ षटकात ४ बाद १८९ धावा काढल्या. फिरोझशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक होता. याआधी दिल्लीकर गुणतालिकेत सर्वात तळाला होते, परंतु या विजयाच्या जोरावर त्यांनी आता सहाव्या स्थानी झेप घेताना गुजरात व बँगलोरला पिछाडीवर टाकले. सलग चार पराभव पत्करल्यानंतर दिल्लीकरांनी जबरदस्त पुनरागमन करताना गतविजेत्यांना धक्का दिला. १८६ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी सांघिक कामगिरीचे प्रदर्शन केले. कोरी अँडरसनने २४ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४१ धावांची खेळी करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तसेच, अष्टपैलू ख्रिस मॉरिसने (१५*) त्याला अंतिम क्षणी मोलाची साथ दिली. संजू सॅमसन (२४) आणि कर्णधार करुण नायर (३९) यांनी २५ चेंडूत ४० धावांची आक्रमक सलामी दिली. त्याशिवाय, रिषभ पंत (३४), श्रेयश अय्यर (३३) यांनीही उपयुक्त खेळी केली. हैदराबादकडून मोहम्मद सिराजने २, तर भुवनेश्वर कुमार व सिध्दार्थ कौल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, स्टार अष्टपैलू युवराज सिंगच्या नाबाद तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने आव्हानात्मक मजल मारली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर - शिखर धवन यांच्या वेगवान सुरुवातीनंतर हैदराबादची धावगती धीमी झाली होती. परंतु, युवराजने सर्व चित्र बदलताना ४१ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह नाबाद ७० धावा कुटल्या. दुर्दैवाने त्याची खेळी व्यर्थ गेली. वॉर्नर (३०), धवन (२८), केन विलियम्सन (२४) आणि मोइसेस हेन्रीकेस (२५*) यांनीही चांगली फटकेबाजी केली. दुखापतीतून सावरलेल्या मोहम्मद शमीने शानदार पुनरागमन करताना हैदराबादचे दोन प्रमुख फलंदाज बाद केले. तसेच, अनुभवी अमित मिश्राने मोक्याच्यावेळी शिखर धवनला बाद करुन हैदराबादच्या धावगतीचा वेग कमी केला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकात ३ बाद १८५ धावा (युवराज सिंग नाबाद ७०, डेव्हिड वॉर्नर ३०; मोहम्मद शमी २/३६) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १९.१ षटकात ४ बाद १८९ धावा (कोरी अँडरसन नाबाद ४१, करुण नायर ३९, रिषभ पंत ३४; मोहम्मद सिराज २/४१)