दिल्ली डेअरडेव्हिल्स सातत्य राखण्यास उत्सुक

By admin | Published: April 27, 2016 05:30 AM2016-04-27T05:30:48+5:302016-04-27T05:30:48+5:30

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला फॉर्मात असलेल्या गुजरात लायन्स संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Delhi Daredevils are keen to maintain consistency | दिल्ली डेअरडेव्हिल्स सातत्य राखण्यास उत्सुक

दिल्ली डेअरडेव्हिल्स सातत्य राखण्यास उत्सुक

Next

नवी दिल्ली : सलग तीन विजय मिळविल्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून, आयपीएलच्या नवव्या पर्वात आज, बुधवारी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला फॉर्मात असलेल्या गुजरात लायन्स संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. यजमान दिल्ली संघ विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे.
झहीर खानच्या नेतृत्वाखालील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला सलामी लढतीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ९ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतरच्या तीन सामन्यांत दिल्ली संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब (८ विकेट), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (७ विकेट) आणि मुंबई इंडियन्स (१० धावा) या संघांचा पराभव केला. दिल्ली संघाने चार लढतींत तीन विजयांसह सहा गुणांची कमाई केली आहे. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवला आहे. गुजरात संघ ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
कोलकाताविरुद्धच्या सलामी लढतीत दिल्ली संघ केवळ ९८ धावांत गारद झाला होता, तर त्यानंतरच्या दोन लढतींत दिल्ली संघाने लक्ष्याचा पाठलाग करीत विजय मिळवला. डी कॉक, सॅमसन आणि ड्युमिनी यांनी फलंदाजीमध्ये छाप उमटवली आहे. पण सलामीवीर श्रेयस अय्यर व करुण नायर यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अष्टपैलू पवन नेगी फ्लॉप ठरला आहे. दिल्ली संघाची गोलंदाजीची बाजू संतुलित भासते. झहीरने आरसीबीविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळता अन्य लढतींमध्ये प्रभावी मारा केला आहे, तर लेगस्पिनर मिश्रा संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वेगवान गोलंदाजांचा विचार करता अष्टपैलू ख्रिस मॉरिस व मोहम्मद शमी यांना सूर गवसत आहे, तर इम्रान ताहिरच्या रूपाने संघाकडे आणखी एक विश्वदर्जाचा फिरकीपटू आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता फलंदाजी ही गुजरात संघाची मजबूत बाजू आहे. त्यांनी चारही विजय लक्ष्याचा पाठलाग करताना मिळवले आहेत. गोलंदाजी संघाची कमकुवत बाजू आहे. त्यांना कामगिरीत सातत्य राखण्यासाठी गोलंदाजीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. गुजराततर्फे फलंदाजीमध्ये अ‍ॅरॉन फिंच, ब्रॅन्डन मॅक्युलम, दिनेश कार्तिक यांच्याव्यतिरिक्त कर्णधार रैना यांनी छाप उमटवली आहे. फिंचने पहिल्या तीन विजयांमध्ये तीन अर्धशतके ठोकली. त्याचा फिटनेस संघासाठी कळीचा मुद्दा आहे. मॅक्युलम व कार्तिक यांनी काही चांगल्या खेळी केल्या. पण कर्णधार रैना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो व रवींद्र जडेजा यांच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. या दोघांनी गोलंदाजीमध्ये छाप उमटवली असली तरी फलंदाजीमध्ये त्यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संघात आॅस्ट्रेलियाच्या जेम्स फॉल्कनरचा समावेश असून, तो अष्टपैलू खेळाडूचा पर्याय ठरू शकतो. गोलंदाजांचे अपयश गुजरात संघासाठी चिंतेची बाब आहे. फिरकीपटू प्रवीण तांबेचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांना अद्याप छाप उमटवता आलेली नाही. ब्राव्होने पंजाबविरुद्धच्या लढतीत २२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले होते. वेगवान गोलंदाज प्रवीणकुमारला पाच लढतींत अद्याप बळींचे खाते उघडता आले नाही. पण धवल कुलकर्णीने प्रभावी मारा केला आहे. याव्यतिरिक्त संघात शादाब जकाती, सरबजित लड्डा आणि फॉल्कनर यांच्यासारख्या गोलंदाजांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला या लढतीत संधी मिळते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. (वृत्तसंस्था)
>उभय संघ यातून निवडणार
दिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), क्विंटन डी कॉक, जेपी ड्युमिनी, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, कार्लोस बे्रथवेट, करुण नायर, पवन नेगी, ऋषभ पंत, संजू सॅमसन, पवन सुयाल, जयंत यादव, ख्रिस मॉरिस, सॅम बिलिंग्स, नॅथन कोल्टर नाइल, इम्रान ताहिर, महिपाल लोमरोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, शाहबाज नदीम, खलील अहमद, अखिल हेरवाडकर आणि प्रत्युष सिंग.
गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), अ‍ॅरॉन फिंच, ब्रॅन्डन मॅक्युलम, ड्वेन ब्रावो, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, अक्षदीप नाथ, जेम्स फॉल्कनर, प्रवीणकुमार, शादाब जकाती, प्रवीण तांबे, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, शिविल कौशिक, धवल कुलकर्णी, सरबजित लड्डा, अमित मिश्रा, प्रदीप संगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन आणि अ‍ॅन्ड्य्रू टाय.

Web Title: Delhi Daredevils are keen to maintain consistency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.