दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलग दुसरा विजय

By admin | Published: April 19, 2015 01:07 AM2015-04-19T01:07:54+5:302015-04-19T01:07:54+5:30

दिल्ली डेअरडेव्हिल्सने शनिवारी खेळल्या गेलेल्या सनराइजर्स हैदराबाद संघाचा ४ धावांनी पराभव केला आणि इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या आठव्या पर्वात दुसरा विजय नोंदवला.

Delhi Daredevils win second consecutive win | दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलग दुसरा विजय

दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलग दुसरा विजय

Next

विशाखापट्टणम : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत कर्णधार जेपी ड्युमिनीच्या (अर्धशतकी खेळी व ४ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने शनिवारी खेळल्या गेलेल्या सनराइजर्स हैदराबाद संघाचा ४ धावांनी पराभव केला आणि इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या आठव्या पर्वात दुसरा विजय नोंदवला.
ड्युमिनी (५४) व श्रेयास अय्यर (६०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ७८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर ४ बाद १६७ धावांची मजल मारली. त्यानंतर ड्युमिनीने (४-१७) अचूक मारा करीत सनराइजर्स संघाचा डाव ८ बाद १६३ धावांत रोखला. सनराइजर्सतर्फे रवी बोपाराने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. दिल्ली डेअरडेव्हिल्सने चार सामन्यांत दोन विजय मिळविताना चार गुणांची कमाई केली. चार सामन्यांत तिसरा पराभव स्वीकारणाऱ्या सनराइजर्सच्या खात्यावर केवळ २ गुणांची नोंद आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना सनराइजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (२८) व शिखर धवन (१८) यांनी सलामीला ५० धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या चार षटकांत सावधगिरी बाळगत फलंदाजी करताना केवळ एक चौकार वसूल केला.
धवनने पाचव्या षटकात अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर तीन चौकार ठोकत धावगतीला वेग दिला तर वॉर्नरने त्यानंतरच्या षटकात डोमिनित जोसेफ मुथ्थूस्वामीच्या गोलंदाजीवर चार चौकार वसूल करीत संघाला अर्धशतक गाठून दिले. दिल्लीचा कर्णधार ड्युमिनीने वॉर्नर व धवन यांना माघारी परतवत दिल्ली संघाला वर्चस्व मिळवून दिले. ड्युमिनीने धवनला बोल्ड केले तर वॉर्नरचा स्वत:च्या गोलंदाजीवर झेल टिपला. बोपारा व लोकेश राहुल (२४) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याआधी श्रेयस अय्यर आणि डेपी डुमिनी यांच्या अर्धशतकांच्या बळावर दिल्लीने ४ बाद १६७ पर्यंत मजल गाठली होती. अय्यरने ४० चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ६०, तसेच डुमिनीने ४१ चेंडू टोलवीत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावांचे योगदान दिले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ७८ धावांची भागीदारी केली. सनराइजर्सकडून भुवनेश्वरकुमारने ४ षटकांत २१ धावांत एक गडी बाद केला. आशिष रेड्डी आणि डेल स्टेन यांनीही एकेक गडी बाद केला. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली, पण त्यांची सुरुवात खराब झाली. मयंक अग्रवाल (१) बाद झाला. अय्यर आणि कर्ण शर्मा यांनी आक्रमक खेळून आठव्या षटकापर्यंत ५० धावा फळ्यावर लावल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक : दिल्ली डेअरडेव्हिल्स : मयंक अग्रवाल झे. धवन गो. भुवनेश्वर ०१, श्रेयस अय्यर झे. वॉर्नर गो. प्रवीण ६०, जेपी ड्युमिनी त्रि. गो. स्टेन ५४, युवराज सिंग झे. वॉर्नर गो. आशिष रेड्डी ०९, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज नाबाद १५, केदार जाधव नाबाद १९. अवांतर (९). एकूण २० षटकांत ४ बाद १६७. बाद क्रम : १-१५, २-९३, ३-१३२, ४-१३२. गोलंदाजी : प्रवीण ४-०-३८-१, स्टेन ४-०-२७-१, भुवनेश्वर ४-०-२१-१, बोपारा ४-०-३८-०, कर्ण २-०-२५-०, आशिष रेड्डी २-०-१५-१.
सनराइजर्स हैदराबाद :- डेव्हिड वॉर्नर झे. व गो. ड्युमिनी २८, शिखर धवन त्रि. गो. ड्युमिनी १८, रवी बोपारा झे. तिवारी गो. ड्युमिनी ४१, लोकेश राहुल त्रि. गो. मॅथ्यूज २४, नमन ओझा झे. ड्युमिनी गो. ताहिर १२, इयोन मोर्गन त्रि. गो. ड्युमिनी ०१, आशिष रेड्डी धावाबाद १५, कर्ण शर्मा झे. मॅथ्यूज गो. कोल्टर नील १९, प्रवीण कुमार नाबाद ०१. अवांतर (४). एकूण २० षटकांत ८ बाद १६३. बाद क्रण : १-५०, २-५१, ३-८९, ४-१२०, ५-१२८, ६-१२९, ७-१५९, ८-१६३. गोलंदाजी : कोल्टर नील ४-०-२६-१, ड्युमिनी ३-०-१७-४, डोमिनिक २-०-२०-०, मॅथ्यूज ४-०-३८-१, ताहिर ४-०-३५-१, मिश्रा २-०-१४-०, युवराज १-०-१०-०.

Web Title: Delhi Daredevils win second consecutive win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.