टायटन्सकडून दिल्ली पराभूत
By admin | Published: February 25, 2016 03:47 AM2016-02-25T03:47:54+5:302016-02-25T03:47:54+5:30
प्रो-कबड्डीच्या यंदाच्या मोसमातील घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या दबंग दिल्लीची अपयशी मालिका येथेही कायम राहिली. तेलगू टायटन्स विरुद्ध कडवा प्रतिकार केल्यानंतरही
- रोहित नाईक, नवी दिल्ली
प्रो-कबड्डीच्या यंदाच्या मोसमातील घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या दबंग दिल्लीची अपयशी मालिका येथेही कायम राहिली. तेलगू टायटन्स विरुद्ध कडवा प्रतिकार केल्यानंतरही दिल्लीकरांना ३६-४४ असा पराभव पत्करावा लागला. आतापर्यंत १० सामने खेळलेल्या दबंग दिल्लीला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आलेला आहे.
त्यागराज क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या सामन्यात सुरुवातीला तेलगूने वर्चस्व राखल्यानंतर दिल्लीने अनपेक्षित मुसंडी मारत बरोबरी साधली. १०व्या मिनिटाला तेलगूने दिल्लीवर पहिला लोण चढवल्यानंतर दिल्लीने केवळ ४ मिनिटांमध्ये या लोणची परतफेड केली. मध्यंतराला तेलगूने २२-२१ अशी नाममात्र आघाडी घेतली होती.
यानंतर मात्र तेलगू टायटन्सने सलग गुण मिळवण्याचा धडाका लावत यजमानांवर प्रचंड दबाव टाकला. यामुळे दिल्लीकरांच्या पकडीही अपयशी ठरल्या आणि त्याचा परिणाम आक्रमकांवर झाला. या संधीचा अचूक फायदा घेताना तेलगूने दुसऱ्या डावात आणखी २ लोण चढवताना दिल्लीचा पराभव निश्चित केला.
तेलगू टायटन्सकडून कर्णधार राहुल चौधरीने तुफानी अष्टपैलू खेळ करताना तब्बल १७ गुणांची कमाई केली. रोहित बलियाननेदेखील खोलवर चढाई करताना १० गुणांसह राहुलला चांगली साथ दिली. तसेच मिराज शेखचा अष्टपैलू खेळ आणि राहुल कुमारच्या दमदार पकडीही तेलगूच्या विजयात मोलाचे ठरले. दुसरीकडे दिल्लीकडून सुरजीत सिंगने एकाकी झुंज देताना आक्रमणात १३ गुण मिळवले. तर कर्णधार रविंदर पहल आणि संदीप धूल यांनी अनुक्रमे एक व दोन सुपर टॅकल करताना अपयशी लढत दिली.