दिल्ली ‘एक टप्पा’ आउट
By admin | Published: April 10, 2015 01:47 AM2015-04-10T01:47:56+5:302015-04-10T01:47:56+5:30
चेन्नई सुपरकिंग्जचे दीडशे धावांचे माफक आव्हान पेलताना एल्बी मोर्कलची धडपड काही ‘इंच’ कमी पडली. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी
चेन्नई : चेन्नई सुपरकिंग्जचे दीडशे धावांचे माफक आव्हान पेलताना एल्बी मोर्कलची धडपड काही ‘इंच’ कमी पडली. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी षटकाराची आवश्यकता असताना एल्बी मोर्कलने मारलेल्या फटक्याचा टप्पा सीमारेषेच्या आत पडल्याने चौकार मिळाला आणि दिल्ली ‘एक टप्पा’ आउट झाली. चेन्नई सुपरकिंग्ज केवळ एका धावेने विजयी झाला.
येथील एम. ए. चिदम्बरम स्टेडीयमवर झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपरकिंंग्ज संघाने ७ बाद १५0 धावा केल्या होत्या. त्याला दिल्लीने ९ बाद १४९ असे प्रत्युत्तर दिले. दिल्लीकडून मोर्कलने ५५ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या.
दिल्लीच्या गोलंदाजांनी चेन्नईसारख्या बलाढ्य संघाला केवळ १५0 धावांत गुंडाळून विजयाची संधी निर्माण केली होती, परंतु फलंदाजांनी या संधीची माती केली. मोर्कलच एकाकी लढला. मयंक अग्रवाल (१५) आणि केदार जाधव (२0) यांचा अपवाद वगळता दिल्लीचे ८ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. चेन्नईकडून सामनावीर आशिष नेहराने २५ धावांत तीन तर ड्वेन ब्राव्होन ३६ धावांत २ बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा कर्णधाराचा निर्णय दिल्ली डेअरडेव्हील्सच्या गोलंदाजांनी योग्य ठरवित यजमान चेन्नई सुपरकिंग्ज संघाला १५0 धावांत रोखले. दिल्लीच्या आॅस्ट्रेलियन गोलंदाज कोल्टर-नाईलने ३0 धावात तीन बळी घेतले. डॅरेन स्मिथ आणि ब्रेंडन मॅक्युलम या जोेडीने चेन्नईच्या डावाची सुरवात केली. स्मिथने मोर्कलला पहिल्याच षटकात तीन खणखणीत चौकार ठोकून एका बाईजच्या चौकारासह १६ धावा चोपल्या. इतका भन्नाट स्टार्ट मिळाल्यावर चेन्नईची गाडी एक्सप्रेस धावेल असे वाटले होते, परंतु पुढच्याच षटकात कोल्टर-नाईलने धोकादायक ब्रेंडन मॅक्युलमला युवराजसिंंगकरवी केवळ चार धावांवर बाद केले. त्याच्या अगोदरच्या चेंडूवर युवराजनेच मॅक्युलमचा झेल सोडला होता. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रैनाचा कोल्टर-नाईलने त्रिफळा उडवून चेन्नईला दुसरा धक्का दिला. रैनाने केवळ चारच धावा केल्या. स्मिथ आणि फेफ ड्युप्लेसिस यांनी डाव सावरताना तिसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. स्थिरावलेल्या सलामीवीर स्मिथचा अडथळा इम्रान ताहिरने दूर केला. त्याने ३४ धावा केल्या. ड्यूप्लेसिसला (३२) त्याच्याच देशाच्या ड्युमिनीने झेलबाद करविले.
महेंद्रसिंग धोनीने आज शांत खेळ केला. २३ चेंडू खेळताना त्याच्या केवळ १७ धावा झाल्या होत्या, पण शेवटच्या षटकांत कोल्टर-नाईलला सलग दोन षटकार ठोकून आपला स्ट्राईकरेट वाढविला. तिसरा षटकार ठोकण्याच्या नादात तो यष्टीरक्षकाकडे उत्तुंग झेल देवून परतला. धोनीने २७ चेंडूत ३0 धावा केल्या. दिल्लीकडून कोल्टर-नाईलने ३0 धावात तीन बळी घेतले. जोसेफ, ताहिर, ड्युमिनी आणि मिश्रा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)