दिल्लीच्या युवा फलंदाजांचा पुन्हा विजय
By Admin | Published: May 11, 2017 12:49 AM2017-05-11T00:49:33+5:302017-05-11T00:49:33+5:30
इतर संघांविरोधात हाराकिरी करणाऱ्या दिल्ली डेअरडेविल्सला गुजरात लायन्स विरोधातच नेमका कसा सूर सापडतो, हा प्रश्न आज गुजरातचा कर्णधार सुरेश रैनाला नक्कीच सतावत असेल.
आकाश नेवे / आॅनलाईन लोकमत
इतर संघांविरोधात हाराकिरी करणाऱ्या दिल्ली डेअरडेविल्सला गुजरात लायन्स विरोधातच नेमका कसा सूर सापडतो, हा प्रश्न आज गुजरातचा कर्णधार सुरेश रैनाला नक्कीच सतावत असेल. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या सामन्यात पुन्हा एकदा गुजरातच्या लायन्स फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला. मात्र यावेळी पंत ऐवजी अय्यरने ९६ धावांची तुफानी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
गुजरातने पहिल्या डावात १९५ धावा केल्या. अरॉन फिंच याने ३९ चेंडूत ६९ धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारु दिली. कार्तिकने देखील ४० आणि इशान किशनने ३४ धावांचे योगदान दिले. गुजरातच्या गोलंदाजांनी दिल्लीला दुसऱ्या षटकात मोठा झटका दिला. संगवानने संजू सॅमसनला तंबूत परत पाठवले. रैनाच्या अफलातून फेकीने रिषभ पंच फक्त ४ धावांवर धावबाद झाला. करुण नायर १५ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरने एका बाजुने तुफानी हल्ला चढवत १५ चौकार आणि २ षटकार लगावत ९६ धावा केल्या. दिल्ली डेअरडेविल्सच्या या युवा फलंदाजाने कोणतीही साथ मिळत नसताना गुजरातला सळो की पळो करुन सोडले. त्यातच मार्लोन सॅम्युअल्स आणि कोरी अँडरसन हे देखील धावबाद झाले. मात्र पॅट कमिन्सने श्रेयसला चांगली साथ दिली दोघांनी ६२ धावांची भागिदारी केली. त्यात पॅटने २४ धावांचे योगदान दिले.
अखेरच्या षटकांत दिल्ली विजयाच्या आणि अय्यर शतकाच्या समीप असताना बसील थम्पीने अय्यरला बाद केले. शतकाला फक्त चार धावा शिल्लक असताना अय्यर बाद झाला. अय्यर बाद झाल्याने रैनाचा चेहरा खुलला, मात्र त्यानंतर अमित मिश्राने थम्पीच्या त्याच षटकांत सलग दोन चौकार लगावत विजय मिळवून दिला.
दिल्ली डेअरडेविल्स आणि गुजरात लायन्स हे दोन्ही संघ स्पर्धेबाहेर पडल्याने हा सामना निव्वळ औपचारिकता म्हणून खेळला गेला. दिल्लीला आणखी दोन तर गुजरातला आणखी एक सामना खेळायचा आहे.