रॉजर फेडरर का करतोय नियमात बदलाची मागणी ?

By admin | Published: July 6, 2017 02:39 PM2017-07-06T14:39:12+5:302017-07-06T14:40:55+5:30

एखादा सामना आपण मोठ्या अपेक्षेने बघायला जावा, त्यात नामवंत खेळाडू खेळणार असावा आणि त्या सामन्यासाठी आपण तगडी रक्कम मोजून महत्प्रयासाने तिकिट मिळवले...

Demand for Roger Federer's Reason for Change? | रॉजर फेडरर का करतोय नियमात बदलाची मागणी ?

रॉजर फेडरर का करतोय नियमात बदलाची मागणी ?

Next
style="text-align: justify;">ललित झांबरे/ऑनलाइन लोकमत 
 
एखादा सामना आपण मोठ्या अपेक्षेने बघायला जावा, त्यात नामवंत खेळाडू खेळणार असावा आणि त्या सामन्यासाठी आपण तगडी रक्कम मोजून महत्प्रयासाने तिकिट मिळवलेले असावे पण,  तो सामनाच पूर्ण खेळला न जाता  घोर निराशा पदरी पडावी, म्हणजे किती संताप होईल, नाही! यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत असंच काहीसं घडलंय आणि त्यामुळे टेनिस जगत ढवळून निघालंय. 
झालंय असं की रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचसारख्या अत्यंत यशस्वी माजी विजेत्या आघाडीच्या टेनिसपटूंचे विम्बल्डनच्या पहिल्या फेरीचे सामने पूर्ण खेळलेच गेले नाहीत. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी दुखापतीचे कारण पुढे करत खच्चून भरलेल्या सेंटर कोर्टवरचे हे सामने अर्धवटच सोडून दिले (वॉकओव्हर). 
युक्रेनच्या अलेक्झांडर डोल्गोपोलोव्हने फेडररविरुध्दचा सामना अवघ्या 43 मिनिटाच्या खेळीनंतर 3-6, 0-3 अशा स्थितीत सोडून दिला तर जोकोविचविरुध्दचा सामनासुध्दा मार्टिन क्लिझान याने फक्त 40 मिनिटाच्या खेळानंतर 3-6, 0-2 अशा स्थितीत सोडून दिला. टीपसारेविक नावाच्या खेळाडूने तर त्याचा सामना फक्त 15 मिनिटाच्याच खेळानंतर सोडून दिला आणि यासाठी या सर्वांनी कारण दिलेय दुखापतीचे! 
केवळ हे तिनच नाही तर यंदाच्या विम्बल्डनच्या पहिल्या फेरीचे असे तब्बल 8 सामने अर्धवट संपले.  विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत वॉकओव्हर दिलेल्या  सामन्यांची ही 2008 नंतरची सर्वात मोठी संख्या आहे. साहजिकच या प्रकाराने प्रेक्षकांच्या पदरी घोर निराशा पडली आणि यासंदर्भात नियमांचा काहीतरी फेरविचार करण्याची किंवा त्यात बदल करण्याची चर्चा जोरात सुरु झाली. स्वतः फेडरर, जॉन केन्रो, टिम हेनमनसारख्या खेळाडूंनी यासाठी आवाज उठवलाय. 
साहजिकच आहे, फेडरर - जोकोविचसारख्या खेळाडूंचे सामने बघण्याला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती असते. आयोजकसुध्दा सेंटर कोर्टसारख्या मानाच्या कोर्टवर त्यांचे सामने प्राईम टाईमच्या वेळेला शेड्युल करत असतात. टेलिव्हिजनवाल्यांचेही याच सामन्यांना प्राधान्य असते. विम्बल्डनच्या पहिल्या फेरीच्या सेंटर कार्टवरच्या सामन्यासाठी प्रेक्षक 56 ब्रिटिश पौडसारखी मोठी रक्कम मोजत असतात आणि असे सामने अर्धवट सोडून जात असतील तर ओरड होणारच! त्यामुळेच फेडरर, केन्रो व हेनमनसारख्या खेळाडूंनी ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या आयोजकांना नियमांचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. 
यासाठी फेडररने पुरुषांच्या व्यावसायिक टेनिसचे नियंत्रण करणाऱ्या "असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी)" ने यंदाच केलेल्या नियमाचा दाखला दिला आहे. या नियमानुसार स्पर्धा सुरू होण्याच्या काही वेळ आधी एखाद्या खेळाडूने त्या स्पर्धेतून माघार घेतली तर तो खेळणार नसला तरी त्याला  त्याच्या पहिल्या फेरीच्या बक्षिसाची रक्कम देण्यात येते आणि  त्या खेळाडूच्या जागी मेन ड्रॉमध्ये "लकी लुझर" म्हणून पात्र खेळाडूला स्थान मिळते. लकी लुझरला पहिल्या फेरीसाठी कोणतेही पैसे मिळत नाहीत तर तो पहिला सामना जिंकल्यानंतरच म्हणजे दुसऱ्या फेरीपासून पैसे दिले जातात. यामुळे आयोजकांवर एकतर आर्थिक ताण येत नाही आणि ऐनवेळी सामने सोडून देण्याचे प्रकारही टळतात. एटीपीच्या या नियमामुळे यंदा व्यावसायिक टेनिस स्पर्धांमध्ये माघारीचे प्रमाण वाढले असुन ऐनवेळी सामना अर्धवट सोडून देण्याचे (वॉक ओव्हर) प्रकार लक्षणीयरित्या घटले आहेत. 
ग्रँड स्लॅम स्पर्धांची मात्र स्वतःची वेगळी नियमप्रणाली आहे. त्या एटीपीच्या नियमाने खेळल्या जात नाहीत. त्यामुळे आताची ही समस्या उद्भवलीआहे. यंदा विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूलासुध्दा 35 हजार ब्रिटिश पौड एवढी घसघशीत रक्कम मिळणार आहे मात्र अट ही आहे की  खेळाडूने तो सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेच पाहिजे. या नियमांतील फरकानेच आणि 35 हजार ब्रिटिश पौडाच्या रकमेच्या आमिषाने यंदाच्या विम्बल्डनमध्ये "वॉक ओव्हर" चे प्रमाण वाढले आहे .
गंभीर बाब ही की आपण सामना खेळू शकणार नाही हे माहित असुनसुध्दा खेळाडू बक्षीस रकमेच्या आमिषाने मैदानावर उतरत आहेत आणि वॉकओव्हर देत आहेत. जोकोवीचचा प्रतिस्पर्धी क्लिझानचा वॉकओव्हर हा असाच होता. पोटरीच्या दुखण्याने आपण सामना पूर्ण करु शकणार नाही हे त्याला ठाऊक होते तरी मैदानात उतरलो नाही तर 35 हजार पौड मिळणार नाही म्हणून तो जेमतेम 40 मिनिटे खेळला. बर्नार्ड टॉमीक या टेनिसपटूने तर सामन्यानंतरच्या मुलाखतीत कबुलीच दिली की आपण कोणतीही दुखापत नसताना दुखापतीचे कारण दिले. त्याच्या या प्रकाराची आता चौकशी होणार आहे.  दुसऱ्या एका खेळाडूने आपण पाठदुखीचा बहाणा करत असल्याचे मान्य केले आहे. डोल्गोपोलोव्ह व टिप्सारेविक यांनीमात्र अशा बनवाबनवीचा इन्कार केला आहे. 
या प्रकारांनी नाराज झालेल्या रॉजर फेडररने ग्रँड स्लॅम आयोजकांना एटिपीच्या नियम काही प्रमाणात का होईना लागू करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणतो की निराशा पदरी पडणाऱ्या प्रेक्षकांबद्दल मला वाईट वाटते कारण ते मोठ्या अपेक्षेने चांगले आणि क्लिन टेनिस बघायला आलेले असतात. आपण सामना पूर्ण खेळू शकणार नाही अशी शंका असणाऱ्या खेळाडूने मैदानात उतरायलाच नको अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे. मात्र न खेळतानाच खेळाडूंना पैसा का द्यायचा, यावरुनही टेनिसजगतात मतभेद आहेत. 
टिकाकारांच्या मते लकी लुजरच्या हक्कावर हा डल्ला आहे. त्यापेक्षा खरोखरच ऐनवेळच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागलेल्या खेळाडूला त्याचा प्रवास खर्च देणे हा अधिक चांगला पर्याय ठरु शकतो असे मत काहींनी मांडले आहे. "वॉक ओव्हर" देणाऱ्या खेळाडूंना ग्रँड स्लॅम आयोजकांनी नियोजीत रकमेच्या निम्मेच रक्कम द्यावी, असे जॉन केन्रो यांनी सुचवले आहे. आता या प्रश्नाला विम्बल्डन आयोजकांनीही गंभिरतेने घेत विचार सुरु केला आहे. त्यानुसार बदल होईल तेंव्हा होईल पण सध्या तरी "वॉक ओव्हर"च्या मुद्द्याने टेनिस जगत "ओव्हरहिट" झाले आहे.

Web Title: Demand for Roger Federer's Reason for Change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.