डेन्मार्क ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू, समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:36 PM2019-10-17T23:36:42+5:302019-10-17T23:36:58+5:30
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला कोरियन प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध ४० मिनिटांत १४-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.
ओडेन्से : विश्वविजेती पी. व्ही. सिंधूचे डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अन सी यंगविरुद्ध पराभवासह आव्हान संपुष्टात आले. पाचवे मानांकन प्राप्त व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला कोरियन प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध ४० मिनिटांत १४-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.
ऑगस्ट महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर सिंधूचा सुरुवातीच्या फेरीमध्ये सलग तिसरा पराभव आहे. तिला चायना ओपनच्या दुसºया व कोरिया ओपनच्या पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. भारताच्या समीर वर्माला एकेरीत आणि पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकिरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. समीर ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या चेन लोंगविरुद्ध २१-१२, २१-१० ने पराभूत झाला. समीरला लोंगच्या वेगवान खेळापुढे फारशी संधी मिळाली नाही. थायलंड ओपन चॅम्पियन सात्विक व चिराग जोडीचा सहाव्या मानांकित चीनच्या चेंग केई व झोऊ हाओ दोंग यांच्याकडून २१-१६, २१-१५ असा पराभव झाला.
सिंधूने पुन्हा केली निराशा
जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर सिंधूला लौकिकानुसार खेळ करण्यात यश आलेले नाही. या स्पर्धेत जबरदस्त विजयी सलामी दिल्यानंतर सिंधू फॉर्ममध्ये आल्याचे वाटले. मात्र, दुसºया फेरीत पुन्हा एकदा सिंधूकडून निराशा झाली. पहिला गेम सहजपणे गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तिने झुंज दिली खरी, मात्र सामना जिंकण्यात ती अपयशी ठरली.