कोटलावर किवींना नमविण्याचा निर्धार
By admin | Published: October 20, 2016 06:28 AM2016-10-20T06:28:19+5:302016-10-20T06:28:19+5:30
फिरोजशाह कोटला! टीम इंडियाचे ‘लकी’ ग्राऊंड! महेंद्रसिंह धोनीच्या विजयी गाथेची साक्ष असलेले मैदान.
नवी दिल्ली : फिरोजशाह कोटला! टीम इंडियाचे ‘लकी’ ग्राऊंड! महेंद्रसिंह धोनीच्या विजयी गाथेची साक्ष असलेले मैदान. स्टार विराट कोहलीचे स्थानिक मैदान तसेच मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्या ‘परफेक्ट टेन’ पराक्रमाचे स्थळ! याच कोटलावर उद्या (गुरुवारी) न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वन डेत भारतीय संघ पाहुण्यांना नमविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
मालिकेत पुनरागमन करणारा सुरेश रैना व्हायरलमधून बरा झालेला नाही. धोनी चॅम्पियन्स ट्रॉफी डोळ्यांपुढे ठेवून संयोजन करीत आहे; पण विजयी संघात कुठलेही बदल करायचे नाहीत, असे धोनीने ठरविलेले दिसते. त्यामुळे फारसे बदल अपेक्षित नाहीत.
खेळपट्टीत वेग असेल तर उमेश यादवच्या सोबतीला हार्दिक पंड्या याला पुन्हा एकदा संधी दिली जाईल. जसप्रीत बुरमाह हा विपरीत परिस्थितीत कामगिरी करू शकतो, तर फिरकीत अमित मिश्रा ही पहिली पसंती असेल. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्यास अक्षर पटेल आणि केदार जाधव यांचीदेखील वर्णी लागू शकते. या सर्वांमध्ये नजरा असतील, त्या कोहलीच्या फलंदाजीकडे. त्याने धरमशाला येथे शानदार फलंदाजी केल्यानंतर स्थानिक चाहत्यांच्या आशा उंचावल्या आहेत. कोहलीने या मैदानावर केवळ आठ वेळा फलंदाजी केली. त्यात इंग्लंडविरुद्ध २०११मध्ये एक शतकही (नाबाद ११२) ठोकले. धोनी हादेखील मोठी खेळी करण्यासाठी आसुसलेला आहे. संधी मिळाल्यास दिल्लीच्या चाहत्यांना धोनीचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण फटके पाहायला मिळू शकतील. भारतीय संघात मधल्या फळीत एका स्थानासाठी चढाओढ आहे. मनीष पांडे आपले स्थान टिकवेल, असे दिसते. केदार जाधवला पुन्हा संधी मिळेल. त्याची गोलंदाजीही संघासाठी लाभदायी ठरू शकेल. न्यूझीलंड संघ सततच्या पराभवामुळे दडपणाखाली आहे. त्यांची फलंदाजी आणि बाद होण्याची पद्धत लक्षात घेतल्यास हा संघ मानसिकरीत्या खचलेला जाणवतो. मार्टिन गुप्तिल आणि रॉस टेलरसारख्या दिग्गज फलंदाजांकडून धावा निघताना दिसत नाहीत. ल्यूक रोंचीदेखील सलग कामगिरीत अपयशीच ठरला. कोरी अँडरसन व जिम्मी निशाम या अष्टपैलू खेळाडूंना इतरांची साथ लाभताना दिसत नाही. सलामीचा टॉम लेथम एकाकी झुंज देत आहे. गोलंदाजीत टीम साऊदी, डग ब्रेसवेल, फिरकी गोलंदाज ईश सोढी, मिशेल सेंटनर यांचा मारा मात्र संतुलित आहे. (वृत्तसंस्था)
>....टीम इंडियाचे हे पसंतीचे मैदान
धोनीने राष्ट्रीय तसेच आयपीएल संघाचे अनेक सामने येथे जिंकले. कोहलीची कारकीर्द येथून सुरू झाली. भारताने ११ वर्षांत येथे एकही सामना गमावलेला नाही. सध्याच्या मालिकेत आतापर्यंत एकतर्फी वर्चस्व गाजविले. ‘धोनी अँड कंपनी’ कोटलावर पुन्हा एकदा शानदार विजय साकार करण्यास सज्ज आहे. भारतीय संघ फॉर्ममध्ये आहे; पण प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत मानण्याची चूक करणार नसल्यामुळे विजयात कसलीही कसर शिल्लक राखायची नाही, या निर्धाराने खेळेल.
कोटलाची खेळपट्टी मंद आणि फिरकीला अनुकूल मानली जाते. या वेळी खेळपट्टी जलद तसेच उसळी घेणारी राहील, असा दावा करण्यात येत असल्याने वेगवान माऱ्यालादेखील लाभ होईल. दुसरीकडे कोहली, रहाणे आणि रोहित शर्मा यांच्यासारखे फलंदाज धावा काढण्यास उत्सुक आहेत.
>संघ यातून निवडतील
भारत :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार),
रोहित शर्मा, अंजिक्य रहाणे,
विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंड्या, अमित मिश्रा, अक्षर पटेल, उमेश यादव, धवल कुलकर्णी, जयंत यादव आणि मनदीपसिंग.
न्यूझीलंड :
केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम लेथम, मार्टिन गुप्तिल, रॉस टेलर, ल्यूक रोंची, मिशेल सेंटनर, ईश सोढी, जिम्मी निशाम, कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, अँटन डेव्हिच, डग ब्रेसवेल, मॅट हेन्री आणि बीजे वॉटलिंग.