विकास उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: June 23, 2016 01:52 AM2016-06-23T01:52:41+5:302016-06-23T01:52:41+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता विकास कृष्णा याने येथे सुरू असलेल्या विश्व आॅलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेच्या ७५ किलोगटात गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली
अझरबैजान : आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता विकास कृष्णा याने येथे सुरू असलेल्या विश्व आॅलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेच्या ७५ किलोगटात गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. आॅगस्ट महिन्यात आयोजित रिओ आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यापासून तो आता एक पाऊल दूर आहे.
दुसरा मानांकित विकास याने जॉर्जियाचा क्वाचाल्दजे जाल याच्यावर ३-० असा विजय साजरा करून अखेरच्या ८ खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. उपांत्यपूर्व सामन्यात विकासला कोरियाच्या बॉक्सरचे आव्हान असेल. याआधी मनोजकुमार (६४ किलो) तसेच सुमीत सांगवान (८१ किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी या तिघांना सेमीफायनलमध्ये स्थान मिळवावे लागेल. ४९ किलोगटात राष्ट्रकुल रौप्यपदकविजेता एल. देवेंद्रोसिंग याने ४९ किलोगटात आधीच सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. या गटात केवळ दोन बॉक्सरचा कोटा असल्याने रिओसाठी पात्रता मिळविण्याकरिता अंतिम फेरी गाठणे अनिवार्य आहे. बुधवार हा विश्रांतीचा दिवस होता.
उद्या (गुरुवारी) विकास, सुमीत आणि मनोज उपांत्यपूर्व सामने खेळतील. देवेंद्रो शुक्रवारी उपांत्य सामन्यात उतरेल. त्याला स्पेनचा सॅम्युअल हेदेरिया याच्याविरुद्ध लढत द्यायची आहे. (वृत्तसंस्था)