देवेंद्रो सिंगची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By admin | Published: June 21, 2016 02:08 AM2016-06-21T02:08:26+5:302016-06-21T02:08:26+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो) याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघातर्फे आयोजित विश्व आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली,
बाकू : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो) याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघातर्फे आयोजित विश्व आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली,
तर अनुभवी मनोज कुमारने (६४ किलो) अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले आहे.
चौथ्या मानांकित देवेंद्रोला सुरुवातीच्या फेरीत बाय मिळाला होता. त्याने एकतर्फी ठरलेल्या लढतीत अर्जेंटिनाच्या लियांड्रो ब्लांकचा ३-० ने पराभव केला,
तर राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेत्या मनोजने वर्चस्व गाजवताना दुसऱ्या मानांकित मोहंमद इस्लाम अहमद अली याच्यावर ३-० ने मात केली.
आशियाई रौप्यपदक विजेत्या देवेंद्रोला मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या सिबुसिसो बांडच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या ली येचानचा पराभव केला. २३ वर्षीय देवेंद्रोला आॅलिम्पिक पात्रता मिळवण्यासाठी अंतिम फेरी गाठावी लागेल. मनोजला यानंतर बुल्गारियाच्या आयरिन स्मेतोव्हच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मनोज उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला तर तो आॅलिम्पिकासाठी पात्र ठरेल. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर ३९ बॉक्सर्सना पात्रता मिळवण्याची संधी आहे. त्यात ४९ किलो गटात दोन, ५२, ५६, ६०, ६९ आणि ८१ किलो वजन गटात प्रत्येकी पाच तर ९१ किलो व ९१ किलोपेक्षा अधिक गटात प्रत्येकी एक स्थान राहील. १००पेक्षा अधिक देशांतील ४०० बॉक्सर्स या अखेरच्या पात्रता स्पर्धेत कोटा स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हौशी बॉक्सर्ससाठी ही अखेरची पात्रता स्पर्धा आहे. भारताने ५६ किलो वजन गटात एकाही बॉक्सर्सला पाठविले नाही. कारण शिव थापाने यापूर्वीच मार्चमध्ये आशियाई पात्रता स्पर्धेदरम्यान रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. (वृत्तसंस्था)