"धवन"ने गाठले नवे "शिखर", सचिनचा तोडला रेकॉर्ड
By admin | Published: June 12, 2017 04:03 AM2017-06-12T04:03:48+5:302017-06-12T04:03:48+5:30
द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शिखरने केलेल्या 78 धावांच्या खेळीनंतर त्याने सचिनचा विक्रम मोडला तर राहूल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे...
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 12 - सुरेख गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर विराट कोहली व शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेटने धुव्वा उडवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपांत्य फेरीत धडक मारली. शिखर धवनच्या 78 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला सहजच विजय मिळाला. ओव्हलच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या सामन्यामध्ये शिखर धवन याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ओव्हलच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी एक धमाकेदार खेळी करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. धवने सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकून हा विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात एक हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजामध्ये धवन आता शिखरावर पोहोचला आहे. आयसीसी स्पर्धेमध्ये शिखर धवनने सर्वाधिक कमी डावात एक हजार धावा पार करण्याचा भीमपराक्रम आपल्या नावे केला आहे. 16 डावामध्ये त्याने हा पराक्रम केला आहे. तर हाच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरने 18 इनिंगमध्ये केला आहे. सौरव गांगुली, हर्षल गिब्स आणि मार्क वॉ यांना हा 1000 रन्स करण्यासाठी 20 इनिंग्स खेळाव्या लागल्या होत्या.
आणखी वाचा : चोकर्स पुन्हा बनले जोकर!!!
2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स स्पर्धेत शिखरने पाच सामन्यात 90. 75 च्या सरासरीने 363 धावा केल्या होत्या या स्पर्धेत त्याला मालिकाविराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत धवन सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूत शिखरावर आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात धवनने 271 धावा ठोकल्या आहेत.
आणखी वाचा : एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!
शिखरच्या नावे आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त अर्धशतकं बणवण्याच्या विक्रमाची बरोबरी धवनने केली आहे. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या विक्रमाची बरोबरी त्याने केली आहे. धवनने आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहा अर्धशतकं बनवली आहेत. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या नावावर सहा अर्धशतकं आहेत. या चॅम्पियन्स ट्रॉफीत शिखर हा विक्रमही आपल्या नावे करेल अशी आशा आहे.