धवन, जडेजांची फिटनेस टेस्ट
By admin | Published: September 27, 2015 12:10 AM2015-09-27T00:10:42+5:302015-09-27T00:10:42+5:30
भारत अ आणि बांगलादेश अ संघांदरम्यान तीन दिवसांचा सराव सामना रविवारपासून येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार आहे
बंगळुरू : भारत अ आणि बांगलादेश अ संघांदरम्यान तीन दिवसांचा सराव सामना रविवारपासून येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार आहे. सामन्यात प्रभावी कामगिरीद्वारे सलामीचा शिखर धवन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना फिटनेस सिद्ध करण्याची; तसेच निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्याची संधी असेल.
बांगलादेश आणि लंकेविरुद्ध सलग दोन शतके ठोकून चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत देणारा धवनच्या हाताला गाले कसोटीदरम्यान फ्रॅक्चर झाले. यामुळे लंका दौऱ्यातील उर्वरित सामन्यांपासून तो वंचित झाला होता. जखमेतून सावरल्यानंतर, भारत ‘अ’ चे नेतृत्व करीत असलेल्या धवनला स्वत:चा फिटनेस तपासण्याची संधी राहील. धावा खेचण्यापेक्षा खेळपट्टीवर अधिक वेळ स्थिरावण्याला तो पसंती देणार आहे. फलंदाजी करताना त्रास जाणवतो का, हे यामुळे कळून येईल. रुबेल हुसेन आणि अल अमीन हुसेन यांच्या सारख्या गोलंदाजांना तोंड देत २ आॅक्टोबर रोजी धर्मशाळा येथे द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्याचीदेखील तो तयारी करू शकतो.
एकवेळ धोनीच्या वन डे संघाचा मोलाचा खेळाडू राहिलेल्या जडेजासाठी सध्या कठीण काळ आहे. निवडकर्त्यांनी सध्या त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बाहेरचा रस्ता दाखविला. राष्ट्रीय संघात स्थान मिळवायचे झाल्यास सरावाद्वारे चमक दाखवावीच लागेल हे त्याला कळून चुकले आहे. जडेजाला कसोटी संघात स्थान मिळण्याची संधी नाही. पण कामगिरी घडल्यास वन डेसाठी त्याचा विचार केला जाऊ शकेल. जडेजा येथे चमकला आणि अक्षर पटेल कामगिरी करण्यात अपयशी ठरला, तर सौराष्ट्रच्या या खेळाडूला वन डे संघात स्थान मिळण्याची चिन्हे आहेत. त्याच्याशिवाय वरुण अॅरोन आणि नमन ओझा यांच्यातही चढाओढ आहे. विराटची पसंती वेगवान गोलंदाजीला आहे. वरुण मात्र बळी घेण्यात अपयशी ठरल्याचे वारंवार स्पष्ट झाले. लंकेविरुद्ध नमनने चांगली सुरुवात केल्यानंतरही मोठी खेळू करू शकला नव्हता. नियमित यष्टिरक्षक असलेल्या रिद्धिमान साहा याच्यावर दडपण आणण्यासाठी नमनला सामन्यात किमान शतक ठोकावेच लागेल. भविष्यातील प्रतिभावान खेळाडूंमध्ये करुण नायर आणि श्रेयस अय्यर यांनादेखील संधी आहे.
म्हैसूर येथे रणजी विजेत्या कर्नाटकविरुद्ध बांगलादेश संघ पराभूत झाला. या सामन्यात किमान विजय नोंदवित संघात चैतन्य
निर्माण करण्यासाठी बांगलादेश खेळणार आहे.(वृत्तसंस्था)