धवनची दीडशतकी खेळी
By admin | Published: September 29, 2015 12:10 AM2015-09-29T00:10:23+5:302015-09-29T00:10:23+5:30
कर्णधार शिखर धवनची दीडशतकी खेळी आणि करुण नायर व विजय शंकर यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात दमदार आघाडी घेणाऱ्या भारत
बंगळुरू : कर्णधार शिखर धवनची दीडशतकी खेळी आणि करुण नायर व विजय शंकर यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात दमदार आघाडी घेणाऱ्या भारत ‘अ’ संघाने सोमवारी दुसऱ्या दिवशी बांगलादेश ‘अ’ संघाची दुसऱ्या डावात २ बाद ३६ अशी अवस्था केली. येथे खेळल्या जात असलेल्या तीनदिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात आज पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या दिवसअखेर भारत ‘अ’ संघाने वर्चस्व मिळवले आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे जवळजवळ अडीच तासांचा खेळ वाया गेला असला तरी भारत ‘अ’ संघाने सामन्यावर पकड मजबूत करण्यात यश मिळवले आहे.
धवनने रविवारी पहिल्या दिवशी शतक पूर्ण केले होते. त्याने १५० धावांची खेळी केली, तर तमिळनाडूचा अष्टपैलू नायरने ७१ व विजय शंकरने ८६ धावांचे योगदान दिले. भारत ‘अ’ संघाने पहिला डाव ५ बाद ४११ धावसंख्येवर घोषित करीत पहिल्या डावात १८३ धावांची दमदार आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेश ‘अ’ संघाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद ३६ धावांची मजल मारली होती. डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप १४७ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी कर्णधार मोमिनुल हक (९) अणि यष्टिरक्षक फलंदाज लिट्टन दास (७) खेळपट्टीवर होते.
त्याआधी, कालच्या वैयक्तिक ११६ धावसंख्येवरून पुढे खेळताना धवनने काही चांगले फटके लगावले. वैयक्तिक १५० धावा फटकावल्यानंतर सकलेन साजिबच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो पायचित झाला. धवनने १४६ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व ३ षटकार लगावले. धवन बाद झाल्यानंतर श्रेयांश अय्यरही (३८) झटपट बाद झाला. त्यानंतर नायर व विजय शंकर यांनी चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. नमन ओझाने (नाबाद २५) शंकरच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर असतानाच पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. पुन्हा खेळ प्रारंभ झाल्यानंतर भारत ‘अ’ संघाने लवकरच डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशतर्फे लेगस्पिनर जुबेर हुसेनने दोन बळी घेतले. त्याने नायर व शंकर यांना तंबूचा मार्ग दाखवला.
बांगलादेश ‘अ’ संघाची दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. ईश्वर पांडेने (४ धावांत १ बळी) तिसऱ्या षटकात अनामुल हक (०) याला माघारी परतवले. सौम्या सरकारला (१९) जयंत यादवने बाद केले. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळपूर्वीच थांबविण्यात आला. (वृत्तसंस्था)
----
संक्षिप्त धावफलक :
बांगलादेश अ पहिला डाव : ५२.४ षटकात सर्व बाद २२८; दुसरा डाव : ११ षटकांत २ बाद ३६.
भारत पहिला डाव : ८६.१ षटकांत ५ बाद ४११ घोषित : शिखर धवन १५०, अभिनव मुकुंद ३४, श्रेयांश अय्यर ३८, करुण नायर ७१, विजय शंकर ८६, नमन ओझा नाबाद २५, जुबेर हुसेन २/७६).