धोनीच सर्वाेत्कृष्ट फिनिशर : कोहली
By admin | Published: March 7, 2016 11:23 PM2016-03-07T23:23:31+5:302016-03-07T23:23:31+5:30
महेंद्रसिंह धोनी हाच जगातील सर्वाेत्कृष्ट फिनिशर आहे, त्याला तोड नाही, असे धोनीचे तोंडभरून कौतुक केलेय ते विराट कोहलीने. विराट म्हणाला, ‘‘भारताला मिळालेला हा सर्वाेत्कृष्ट फिनिशर आहे.
नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी हाच जगातील सर्वाेत्कृष्ट फिनिशर आहे, त्याला तोड नाही, असे धोनीचे तोंडभरून कौतुक केलेय ते विराट कोहलीने. विराट म्हणाला, ‘‘भारताला मिळालेला हा सर्वाेत्कृष्ट फिनिशर आहे. बिनधास्तपणे खेळणे ही त्याची शैली आहे आणि त्याच पद्धतीने त्याने सामन्याचा शेवट केला. वास्तविक शिखर धवननेसुद्धा चांगली खेळी केली. दुसऱ्या बाजूने धावगती कायम ठेवण्याची जबाबदारी माझी होती. ती भूमिका मी निभावली. दोघांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. त्यानंतर धोनीने आपल्या स्टाईलमध्ये फलंदाजी करीत शेवट गोड केला. अखेरच्या दोन षटकांत १९ धावांची आवश्यकता असताना अवघ्या ६ चेंडूंत त्याने २० धावा फटकावल्या. निश्चितच हा विजय आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.’’ चषक जिंकल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला.
विश्वचषकापूर्वी संघाचा उंचावलेला आत्मविश्वास आणि प्रत्येक जण फॉर्ममध्ये असणे हे भविष्यासाठी चांगले संकेत आहेत. गेल्या काही सामन्यांत युवराज सिंगनेसुद्धा चांगली खेळी केली आहे. सुरेश रैना हा तर टी-२० चा धोकादायक खेळाडू आहे. रोहित शर्मा शानदार आहे.
धोनीची तर तुलना करणे योग्यच ठरणार नाही. तो आपली भूमिका उत्कृष्टपणे निभावतो. त्यामुळे विश्वचषकात भारताची कामगिरी चांगली असेल, असा विश्वास आहे. योग्यसमयी योगदान दिल्याचे समाधान मलासुद्धा आहे. श्रीलंकेविरुद्ध जेव्हा विश्रांती घेतली तेव्हा माझ्याबाबत बरीच उलटसुलट चर्चा रंगली होती. बऱ्याच गोष्टी लिहिल्या गेल्या. ही काय विश्रांतीची वेळ आहे काय? असे प्रश्न उपस्थित झाले होते. मी मात्र मानसिकरीत्या ताजातवाना झालो. मला विश्रांतीची गरज होती. (वृत्तसंस्था)