‘फास्ट ट्रॅक’वर धोनी ब्रिगेडची कसोटी

By admin | Published: January 12, 2016 04:22 AM2016-01-12T04:22:46+5:302016-01-12T04:22:46+5:30

भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सलामी लढतीच्या

Dhoni brigade test on fast track | ‘फास्ट ट्रॅक’वर धोनी ब्रिगेडची कसोटी

‘फास्ट ट्रॅक’वर धोनी ब्रिगेडची कसोटी

Next

पर्थ : भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सलामी लढतीच्या निमित्ताने भारतीय संघव्यवस्थापन संघाचा योग्य ताळमेळ साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. या मालिकेपासून विश्वकप टी-२० स्पर्धेपर्यंत मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या प्रदीर्घ कालावधीच्या कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनासाठी संघाचा योग्य ताळमेळ साधणे महत्त्वाचे आहे.
भारताने दुय्यम दर्जाच्या पश्चिम आॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध दोन्ही सराव सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यात एक टी-२० व एक वन-डे सामन्यांचा समावेश होता. पाहुण्या संघाला या मालिकेत स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील संघाकडून यापेक्षा कडवे आव्हान मिळणार आहे, हे निश्चित.
धोनीसाठी काही अंशी दिलासा देणारी बाब म्हणजे आॅस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. याव्यतिरिक्त मिशेल स्टार्क दुखापतग्रस्त आहे तर मिशेल जॉन्सनने निवृत्ती स्वीकारली आहे. आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांमध्ये समावेश असलेल्या जोश हेजलवुड, जोएल पॅरिस, स्कॉट बोलँड आणि जिमी फॉकनर अनुभवाच्या बाबतीत कमकुवत भासतात.
गोलंदाजांचा समतोल साधणे धोनीसाठी सर्वांत महत्त्वाची बाब आहे. संघातील सर्वांत अनुभवी गोलंदाज ईशांत शर्माने दोन सराव सामन्यांमध्ये गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे तो पहिल्या लढतीत खेळेलच, हे निश्चित सांगता येत नाही. आॅस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्टी असा लौकिक असलेल्या वाकाच्या खेळपट्टीवर तीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळणार, हे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर सरणला पदार्पणाची संधी मिळू शकते तर ईशांत आणि उमेश यादव त्याचे सहकारी राहण्याची शक्यता आहे. दोन अनुभवी अष्टपैलू फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा गोलंदाजीचे आक्रमण सांभाळणारे अन्य सदस्य असू शकतील.
भारताचा फलंदाजी क्रम जवळजवळ निश्चित आहे. त्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सांभाळतील तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली येईल. अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर खेळण्याची आशा असून, भारतीय कर्णधार पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. सहाव्या क्रमांकावर नवा चेहरा दिसू शकतो. संघात सुरेश रैना नसल्यामुळे या स्थानी मनीष पांडे किंवा गुरकिरत मान यांना संधी मिळू शकते. गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण करणाऱ्या पांडेने सराव सामन्यात ५८ धावांची खेळी करताना आपला दावा मजबूत केला आहे. गुरकिरतने स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाब आणि भारत ‘अ’ संघातर्फे सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त वेगवान गोलंदाजी क रणारे अष्टपैलू ऋषी धवन आणि भुवनेश्वर कुमार यांचाही पर्याय उपलब्ध आहे. धोनीसाठी आगामी काही महिने महत्त्वाचे आहेत. कारण त्याची विश्वकप टी-२० स्पर्धेपर्यंत कर्णधारपदी नियुक्ती केलेली आहे.
भारताला धोनीकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अलीकडच्या कालावधीत त्याला फलंदाजीमध्ये विशेष छाप सोडता आलेली नाही. धोनी कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करतो, याबाबत उत्सुकता आहे. स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सूर गवसला तर भारतीय गोलंदाजांपुढे त्यांना रोखण्याचे आव्हान राहील. वॉर्नर जर उपलब्ध असेल तर तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांपुढे त्याला रोखण्याचे मोठे आव्हान राहील. अ‍ॅरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात कुठलेही गोलंदाजी आक्रमण उधळून लावण्याची क्षमता आहे. माजी कर्णधार जॉर्ज बेली क्रिकेटच्या या प्रकारात अनुभवी आहे. त्याच्याकडे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाची डाव सांभाळण्याची जबाबदारी राहील. जेम्स फॉकनरही आपल्या फलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणण्यात सक्षम आहे. आॅस्ट्रेलियाने सामन्याच्या एक दिवसापूर्वीच अंतिम ११ खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यात २३
वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज जोएल पॅरिस आणि २६ वर्षांचा स्कॉट बोलँड यांना वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळणार आहे. मिशेल मार्श आणि जेम्स फॉकनर फलंदाजीसह गोलंदाजीची बाजू मजबूत करण्यास सक्षम आहे. (वृत्तसंस्था)

भारतीय संघासाठी २०१५ हे वर्ष फारसे चांगले राहिले नाही. भारताला बांगलादेशविरुद्ध बांगलादेशमध्ये तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात वन-डे मालिका गमवावी लागली.
कर्णधार धोनी नव्या वर्षात संघाला नवी उंची गाठून देण्यासाठी प्रयत्नशील असेल, पण स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला एकही चेंडू
न टाकता स्नायूच्या दुखापतीमुळे दौऱ्यातून माघार घ्यावी लागली, याचे कर्णधाराला नक्कीच दु:ख झाले असेल.
आॅस्ट्रेलियातील पाच वन-डे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसह भारतीय संघ मार्च-एप्रिलमध्ये भारतात होणाऱ्या आयसीसी विश्व टी-२० चॅम्पियनशिपसाठी आपली तयारी सुरू करणार आहे.
पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेनंतर तीन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपामध्ये संघाची लय कायम राखण्यास प्रयत्नशील आहे.

तीन वेगवान व दोन
फिरकीपटूंना संधी : धोनी
वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूची उणीव भासत असल्याचे स्पष्ट करताना भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मंगळवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन-डेमध्ये तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांसह खेळण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘या लढतीत ३-२ च्या कॉम्बिनेशनसह खेळावे लागेल. आमच्याकडे वेगवान मारा करण्याची क्षमता असलेला अष्टपैलू नाही. खेळाडूंच्या कामगिरीवर नजर ठेवावी लागेल.’
कर्णधाराच्या वक्तव्यामुळे हिमाचल प्रदेशचा ऋषी धवन संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर झाला. कारण त्याला अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळाले होते.
आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील युवा खेळाडूंना संदेश देताना धोनी म्हणाला, ‘प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून आणि प्रत्येक संधी आव्हान म्हणून बघा.’
कर्णधाराने कुणाचे नाव न घेता स्पष्ट संकेत दिले की, डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर सरण मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे.

सहकाऱ्यांना भारतीय गोलंदाज सरणबाबत माहिती दिली : स्मिथ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरिंदर सरण हा अपरिचित चेहरा असला तरी आॅस्ट्रेलियन कर्णधाराला त्याची अजिबात माहिती नाही, असे नाही. या युवा गोलंदाजाकडे प्रभावित करणारी विविधता असून, ड्रेसिंग रूममध्ये त्याच्याबाबत चर्चा झाली, असे स्मिथने सांगितले.
मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या लढतीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना स्मिथने आयपीएल संघातील त्याचा सहकारी असलेल्या वेगवान गोलंदाजाबाबत सांगितले की, ‘भारतात सरणला वन-डे क्रिकेट खेळताना बघितले नाही़; पण आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघातर्फे त्याला गोलंदाजी करताना बघितले आहे. तो प्रभावी मारा करण्यास सक्षम आहे. तो उंच चणीचा असून चेंडूला लवकर स्विंग करतो.

प्रतिस्पर्धी संघ
भारत :- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, गुरकिरतसिंग मान, मनीष पांडे, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, उमेश यादव, बरिंदर सरण, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि ऋषी धवन.

आॅस्ट्रेलिया :- स्टिव्हन स्मिथ (कर्णधार), अ‍ॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, मिशेल मार्श, जेम्स फॉकनर, मॅथ्यू वॅड, केन रिचर्डसन, जोश हेजलवुड, जोएल पॅरिस आणि स्कॉट बोलँड.

हेड
टू हेड
भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यामध्ये आत्तापर्यंत ११८ एकदिवसीय लढती झाल्या आहेत. यामध्ये भारतीय संघाने ४० तर आॅस्ट्रेलिया संघाने ६८ सामन्यांमध्ये विजय नोंदविला आहे. १० सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.

सामना (भारतीय वेळेनुसार) : सकाळी ८.५० पासून.

Web Title: Dhoni brigade test on fast track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.