धोनी, विराट भिन्न शैलीचे कर्णधार
By admin | Published: January 9, 2016 03:24 AM2016-01-09T03:24:48+5:302016-01-09T03:24:48+5:30
महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती असून, त्यांची नेतृत्वशैलीही वेगवेगळी आहे, असे मत भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने व्यक्त केले.
नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती असून, त्यांची नेतृत्वशैलीही वेगवेगळी आहे, असे मत भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने व्यक्त केले.
जागतिक क्रमवारीत कसोटीमध्ये अव्वल गोलंदाज व अष्टपैलू असलेल्या आश्विनने धोनी आणि विराट यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना सांगितले की, ‘अन्य कर्णधारांच्या तुलनेत धोनीमध्ये अधिक चर्चा न करणे आणि प्रतिक्रिया न देणे हा एक विशेष गुण आहे. अनेकदा आम्ही त्याच्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा करतो, पण तो काही न बोलता थेट ड्रेसिंग रूममध्ये जातो. ही त्याची विशेषता आहे. त्याला समजून घेणे कठीण आहे. हे त्याचे वर्तन योग्य आहे किंवा नाही, हे माहीत नाही पण ही त्याची विशेषता आहे.’
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आश्विनने विराटबाबत बोलताना म्हटले की, ‘विराट कोहलीमध्ये कमालीचा उत्साह असतो. कर्णधारपदाच्या छोटेखानी कारकिर्दीमध्ये तो सातत्याने चांगले करण्यास उत्सुक असतो आणि सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रेरित करतो. त्याच्याबाबत सर्वकाही चांगलेच आहे.’
आपल्या गोलंदाजीबाबत बोलताना आश्विन म्हणाला,‘मी नेहमी जगातील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून नावलौकिक मिळविण्यास प्रयत्नशील होतो. ही चांगली बाब असली, तरी माझ्या मते मला अद्याप लक्ष्य गाठता आलेले नाही. जोपर्यंत लक्ष्य गाठत नाही, तोपर्यंत त्यासाठी प्रयत्नशील राहील. मी एक दिवस नक्कीच हा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरेल, पण सध्या मानांकनाचा विचार करता अव्वल स्थानावर असल्यामुळे आनंदी आहे.’
आश्विनने गेल्या वर्षी ९ कसोटी सामन्यांत ६२ बळी घेतले आणि वर्षाचा शेवट ‘नंबर वन कसोटी गोलंदाज’ म्हणून केला. बिशनसिंग बेदीनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. बेदी यांनी १९७३ मध्ये अशी कामगिरी केली होती. शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांना आपला आदर्श मानणाऱ्या आश्विनने सांगितले की,‘हे दोन्ही गोलंदाज माझ्यासाठी ‘हिरो’ आहेत. मी त्यांच्यादरम्यान तुलना करू शकत नाही, पण जर मला हजार डॉलर्स देऊन एखाद्या गोलंदाजाला बघायला जायचे असते तर मी वॉर्नला बघणे पसंत करील. कारण, तो ९ क्षेत्ररक्षकांना एकाचवेळी सांभाळणारा शानदार गोलंदाज आहे. अन्य गोलंदाजांमध्ये अशी प्रतिभा नाही.’ (वृत्तसंस्था)