व्हिट्टोरीच्या ड्रीम टीममध्ये धोनीला स्थान नाही, विराट कर्णधार
By admin | Published: May 10, 2017 11:02 AM2017-05-10T11:02:24+5:302017-05-10T11:02:24+5:30
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिट्टोरीने काल आपल्या ड्रीम टीमची घोषणा केली आहे. त्याच्या ड्रीम टीममध्ये भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीला स्थान मिळाले नाही.
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 10 - न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिट्टोरीने काल आपल्या ड्रीम टीमची घोषणा केली आहे. त्याच्या ड्रीम टीममध्ये भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीला स्थान मिळाले नाही. व्हिट्टोरीने आपल्या ड्रीम टीमचे नेतृत्व रणमशीन विराट कोहलीकडे सोपवले आहे. लॉर्डस क्रिकेट मैदानाच्या सहकार्याने व्हिट्टोरीने आपल्या ड्रीम टीमची निवड केली. ज्या खेळाडूंसोबत, विरुद्ध आपण खेळलो किंवा ज्यांच्याकडून प्रेरणा मिळाली, अशा खेळाडूंची संघात निवड करायची होती. यामध्ये भारताच्या तीन, ऑस्ट्रेलियाच्या चार, श्रीलंकेच्या दोन, आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या एका खेळाडूचा समावेश आहे. द. आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसची 12 वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. व्हिट्टोरीने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहलीची आपल्या ऑल टाइम इलेव्हनमध्ये निवड केली आहे.
आयपीएलमध्ये आरसीबीचा मुख्य कोच असलेल्या व्हिट्टोरीने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंग, विकेटकीपर फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट, महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आणि फिरकीपटू शेन वॉर्नची संघात निवड केली आहे. न्यूझीलंडकडून महान अष्टपैलू खेळाडू सर रिचर्ड हॅडली यांचीच संघात निवड होऊ शकली. श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि मुथय्या मुरलीधरन तर द. आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलर्स यांची निवड केली आहे.
व्हिट्टोरीने 113 कसोटींत 362 बळी घेतले आहेत. व्हिट्टोरी रंगना हेराथनंतर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी डावखुरा फिरकीपटू आहे. त्याने कसोटीत 20 वेळा 5 पेक्षा अधिक बळी घेतले आहेत.
व्हिट्टोरीची ड्रीम टीम
रिकी पॉटिंग, राहुल द्रविड, विराट कोहली (कर्णधार), ए. बी. डिव्हिलर्स, सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, अॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, रिचर्ड हॅडली, जॅक कॅलिस.