धोनीला स्थिरावण्यास वेळ लागत नाही : कुंबळे
By admin | Published: October 20, 2016 06:32 AM2016-10-20T06:32:51+5:302016-10-20T06:32:51+5:30
कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या ‘फिनिशर’च्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
नवी दिल्ली : कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या ‘फिनिशर’च्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह लावले जात आहे. त्याच वेळी त्याला वरच्या स्थानावर फलंदाजीला पाठविणे योग्य ठरेल का, अशीदेखील चर्चा होते. या पार्श्वभूमीवर कोच अनिल कुंबळे यांनी धोनीकडे पुरेसा अनुभव असल्याने त्याला क्रिझवर स्थिरावण्यास अधिक वेळ लागत नसल्याचे सांगितले.
पुढील वर्षी ब्रिटनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी धोनीला फलंदाजीत वरच्या स्थानावर खेळण्यास सांगितले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात कुंबळे म्हणाले, की हे सर्वसामन्यांतील परिस्थितीवर अवलंबून असते. लक्ष्याचा पाठलाग करताना अधिक अनुभव लागतो. धोनीकडे असा पुरेसा अनुभव आहे. फलंदाज या नात्याने सामर्थ्यवान असल्याने त्याने इतक्या वर्षांत दाखवून दिले.
धोनीला क्रिझवर स्थिरावण्यासाठी वेळ द्यायला हवा, यावर विचारमग्न होण्याची आम्हाला गरज नाही. मनीष पांडे हा घरच्या मैदानावर चौथ्या स्थानावर खेळतो. लहानशा कारकिर्दीत त्याने हे सिद्धही केले. गरज भासल्यास मनीषलादेखील वरच्या स्थानावर पाठविण्याची आमची तयारी असल्याचे कुंबळे यांनी स्पष्ट केले.
के. एल. राहुल आणि शिखर धवन जखमी झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला वरच्या क्रमावर खेळण्याची संधी मिळाली, असे सांगून कुंबळे म्हणाले, की इंग्लंड संघ भारतात येईल, त्या वेळी स्थिती अधिक स्पष्ट होईल. माझ्या मते रहाणे वरच्या स्थानावर फिट बसतो. आम्ही यावर कायम राहू. शिखर आणि राहुल फिट झाल्यानंतर पर्याय राहतील. वन डे मालिकेत रहाणे डावाचा प्रारंभ करेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी मात्र कोण सुरुवात करेल, याचा निर्णय नंतर घेतला जाईल.(वृत्तसंस्था)
>हार्दिकमुळे संघात संतुलन निर्माण होईल. तो चांगला वेगवान मारा करतो. नव्या चेंडूने त्याने अप्रतिम मारा केला. फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू संघासाठी उपयुक्त आहे, असे मी म्हणालो होतो. पंड्या असाच खेळाडू असल्याने त्याच्या प्रगतीकडे आमचे लक्ष आहे. हार्दिकने सात-आठ षटके चांगली टाकल्यास संघात संतुलन निर्माण होण्यास मदत मिळणार, अशी मला खात्री आहे.
- अनिल कुंबळे