धोनीला आदर्श मानतो त्रिशतकवीर मोहित अहलावत
By Admin | Published: February 9, 2017 02:43 PM2017-02-09T14:43:42+5:302017-02-09T14:43:42+5:30
धोनी माझा आवडता खेळाडू असून, मला त्याच्याकडून प्रेरणा मिळते असं मोहित बोलला आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - दिल्लीचा क्रिकेटपटू मोहित अहलावत याने टी-२० क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. टी-२० क्रिकेटमधील कुठल्याही स्तरावर असा भीमपराक्रम करणारा मोहित जागतिक क्रिकेटमध्ये पहिलाच खेळाडू ठरला. मोहित अहलावतने केवळ ७२ चेंडूंत ३९ षटकार आणि १४ चौकारांसह ३०० धावा ठोकल्या.
यानंतर प्रत्येकाच्या तोंडी फक्त मोहित अहलावत याचंचं नाव आहे. याअगोदर मोहित अहलावत याने तीन सामन्यांमध्ये फक्त पाच धावा केल्या होत्या. मात्र या खेळीमुळे तो चर्चेत आला आहे. मोहितच्या या रेकॉर्डब्रेक खेळीची तुलना ए बी डेव्हिलिअर्ससोबत केली जात आहे. मात्र मोहित हे योग्य मानत नाही. मी कधीही डेव्हिलिअर्सला कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. खरं तर तसं करणं शक्यच नाही असं मोहित अहलावत बोलला आहे.
'मी माझी नैसर्गिक खेळी खेळलो. मी कोणतेही वेगळे शॉट खेळलो नाही', असं मोहितने सांगितलं आहे. दिल्लीच्या या विकेटकीपरला जेव्हा कोणाला आदर्श मानतो ? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतलं. 'धोनी माझा आवडता खेळाडू असून, मला त्याच्याकडून प्रेरणा मिळते', असं मोहित बोलला आहे.
दिल्लीमधील ललिता पार्क मैदानात झालेल्या एका स्थानिक टी-२० क्रिकेट लीग स्पर्धेत मोहितने फ्रेंड्स इलेव्हनविरुद्ध खेळताना अवघ्या ७२ चेंडूंत तब्बल १४ चौकार आणि ३९ षटकारांची आतषबाजी करताना ३०० धावांचा झंझावात केला. या खेळीमध्ये २३४ धावा त्याने षटकारांसह, तर ५६ धावा चौकारांसह काढल्या. म्हणजेच केवळ १० धावा त्याने धावून काढल्या. मोहितच्या या रुद्रावताराच्या जोरावर त्याच्या मावी इलेव्हन या संघाने निर्धारित २० षटकांत ४१६ धावांचा ‘एव्हरेस्ट’ उभारला.