क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच धोनीवर नामुष्की
By admin | Published: February 19, 2017 05:01 PM2017-02-19T17:01:16+5:302017-02-19T17:39:33+5:30
13 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत भारतीय संघाला अत्युच्च पातळीवर नेणा-या महेंद्रसिंग धोनीला पहिल्यांदाच नामुष्कीला सामोरं जावं लागलं.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - 13 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत भारतीय संघाला अत्युच्च पातळीवर नेणा-या महेंद्रसिंग धोनीला पहिल्यांदाच नामुष्कीला सामोरं जावं लागलं. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीने स्वतःच 2014 मध्ये कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तर 2017 च्या सुरूवातीला एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदाहून पायउतार होण्याचा निर्णयही त्याचाच होता. मात्र, आयपीएल 10 च्या सत्रासाठी पुणे सुपरजायंट्स संघाने धोनीला कर्णधारपदावरून हटवलं आहे.
धोनीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची नियुक्ती करण्यात आली आहे. तरूण नेतृत्वाकडे संघाची धुरा असावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं टीमचे मालक संजीव गोयंका यांनी सांगितलं आहे. पीटीआयसोबत बोलताना गोयंका म्हणाले, एक कर्णधार आणि व्यक्ती म्हणून मी धोनीचा सन्मान करतो. पण गेल्या वर्षी आमच्या संघाचं प्रदर्शन चांगलं नव्हतं. एखाद्या तरूण खेळाडूने संघाचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा होती. त्यामुळे नवं सत्र सुरू होण्याआधी आम्ही हा बदल केला आहे. संघाच्या भल्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचं धोनीनेही स्वागत केलं आहे असं गोयंका म्हणाले.
त्यामुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारातून कर्णधारपदाचा राजीनामा देणा-या धोनीला कर्णधारपदावरून हटवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. गेल्या वर्षी धोनीच्या कर्णधारपदाखाली खेळणा-या 17 सामन्यांपैकी पुणे सुपरजायंट्सने केवळ पाच सामन्यात विजय मिळवला होता. गुणतालिकेत पुण्याचा संघ खालून दुस-या नंबरवर राहिला होता. याशिवाय गेल्यावर्षी धोनीने आयपीएलमध्ये 12 इनिंगमध्ये केवळ 284 धावा केल्या होत्या. यामध्ये केवळ एका अर्धशतकी खेळीचा समावेश होता.
आयपीएल-10 स्पर्धेचा थरार 29 मार्चला समाप्त होणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.