धोनीला विशेष वागणूक मिळते, जी आम्हाला मिळत नाही - हरभजन सिंग
By admin | Published: May 26, 2017 08:25 AM2017-05-26T08:25:17+5:302017-05-26T08:38:14+5:30
आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी महेंद्रसिंग धोनीची निवड झाल्याच्या पार्श्वभुमीवर बोलताना हरभजन सिंगने हे वक्तव्य केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - भारतीय क्रिकेट संघ निवडण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विशेषाधिकार दिले जातात असं हरभजन सिंग बोलला आहे. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी महेंद्रसिंग धोनीची निवड झाल्याच्या पार्श्वभुमीवर बोलताना हरभजन सिंगने हे वक्तव्य केलं आहे. धोनी फॉर्ममध्ये नसला तरी त्याच्याकडे रणनीती आखण्याची योग्य क्षमता असून, यामुळे त्याने अनेकदा सामना आपल्याबाजूने झुकवला असल्याचं बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद बोलले होते. यावर प्रतिक्रिया देताना हरभजनने आपणदेखील सीनिअर खेळाडू असून फक्त बॉलिंग नाही तर धोनीप्रमाणे सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता असतानाही आपला विचार केला गेला नाही अशी टीका केली आहे.
"धोनी फॉर्ममध्ये असो वा नसो मात्र आपल्या बँटिंगच्या जोरावर नाही, तर इतर गोष्टींमुळे संघाला पुढे घेऊन जातो यात दुमत नाही. पण अगोदर ज्याप्रमाणे तो खेळायचा तसा तो आता खेळत नाही हेदेखील तितकंच खरं आहे", असंही हरभजन बोलला आहे. "तो कर्णधार राहिला असल्याने त्याला खेळ कळतो, आणि ही त्याची जमेची बाजू आहे", असं हरभजनने सांगितलं आहे.
"पण जेव्हा माझी वेळ येते, तेव्हा मला अशी विशेष वागणूक दिली जात नाही", अशी खंत हरभजनने व्यक्त केली आहे.
"आम्हीदेखील गेल्या 19 वर्षापासून भारतीय संघाकडून खेळत आहोत. आम्हीदेखील अनेक सामने जिंकले आहेत. दोन वर्ल्ड कपही जिंकले आहेत. पण ही विशेष वागणूक, विशेषाधिकार फक्त काही खेळाडूंनाच, आणि इतरांना नाही असं का ? आणि ज्यांनी ही विशेष वागणूक मिळत नाही त्यातील एक मी आहे. असं का होतं याची मलाही कल्पना नाही", असं स्पष्ट मत हरभजनने व्यक्त केलं आहे.
यावेळी हरभजन सिंगने आपल्यासोबत गौतम गंभीरच्याही नावाचा साधा विचारही न केला असल्याचं सांगत खडे बोल सुनावले आहेत. "हे खूप चुकीचं आहे. भारतीय संघात आपल्याला स्थान मिळावं यासाठीच आम्ही आयपीएल खेळतो. जर एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्याला स्थान दिलं पाहिजे. गौतम गंभीरने देखील उत्तम कामगिरी केली आहे. मलाही निवड समितीकडून अपेक्षा होती. पण मला माहित आहे जर अश्विन फीट असेल तर त्यालाच संघात घेतील. आणि जर नसेल तरच मला संधी आहे", असं हरभजन सिंग बोलला आहे.