चुकीचे फटके निवडून फलंदाजांनी केले निराश - धोनी
By admin | Published: March 16, 2016 08:44 AM2016-03-16T08:44:59+5:302016-03-16T11:13:37+5:30
सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या दारुण पराभवासाठी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने फलंदाजांना जबाबदार धरले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १६ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या दारुण पराभवासाठी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने फलंदाजांना जबाबदार धरले आहे. फलंदाजांनी चुकीच्या फटक्यांची निवड केल्यामुळे पराभव झाल्याचे धोनीने म्हटले आहे.
आम्ही न्यूझीलंडला कमी धावांवर रोखले पण फलंदाजांनी हाराकिरी केली. चुकीच्या फटक्यांची निवड केल्यामुळे मैदानावर येणा-या फलंदाजांवर दबाव वाढत गेला असे धोनीने म्हटले आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगला उपयोग करुन घेतला. पण खेळपट्टीशी जुळवून घेण्यात आम्ही कमी पडलो. फलंदाजांनी निराशा केली असे धोनीने सांगितले.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताच सलामीच्याच सामन्यात न्यूझीलंडने ४७ धावांनी दणदणीत पराभव केला. टी-२० फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे.
टी-२०मध्ये न्यूझीलंडकडून भारताचा हा सलग पाचवा पराभव ठरला. न्यूझीलंडच्या १२७ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या ७९ धावात आटोपला.