धोनीपुढे नवे आव्हान

By admin | Published: June 11, 2016 06:20 AM2016-06-11T06:20:37+5:302016-06-11T06:20:37+5:30

अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम इंडियाची नेतृत्व करण्याची महेंद्रसिंग धोनी याला सवय आहे.

Dhoni has a new challenge | धोनीपुढे नवे आव्हान

धोनीपुढे नवे आव्हान

Next


हरारे : अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम इंडियाची नेतृत्व करण्याची महेंद्रसिंग धोनी याला सवय आहे. पण आज, शनिवारी येथे खेळल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या वन डेत ‘नवा लूक’ असलेल्या संघाचे कर्णधारपद सांभाळून विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान धोनीपुढे असेल.
गेल्या काही वर्षांपासून आयपीएल आटोपताच झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताचा दुय्यम संघ वन डे मालिका खेळण्यासाठी पाठविला जातो. बीसीसीआयला याद्वारे ‘बेंच स्ट्रेंग्थ’ तपासून पाहण्याची संधी मिळते. २०१३ आणि २०१५च्या दौऱ्यात भारताच्या दुय्यम दर्जाच्या संघाने देखील झिम्बाब्वेचा क्रमश: ५-० आणि ३-० ने व्हाईटवॉश केला. यंदा काही वेगळा निकाल राहण्याची शक्यता नाही. १५ जणांच्या संघातील पाच खेळाडूंना येथे खेळण्याचा अनुभव आहे. धोनी स्वत: ११ वर्षांनंतर आफ्रिकन देशात खेळत आहे. तो २००५ मध्ये झिम्बाब्वेत खेळला होता. त्यावेळी सौरभ गांगुली कर्णधार होता तर धोनीला संघात येऊन केवळ सहा महिने झाले होते. धोनी आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. कर्णधारपद टिकविण्याची चिंता त्याला नसली तरी या दौऱ्यात अनुभवी सहकारी नसल्याने धोनीला प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याशिवाय पर्याय नाही. या मालिकेतील निकालावर आनंद साजरा करण्याची स्थिती नाही पण पराभव मात्र आत्मपरीक्षण करायला भाग पाडू शकतो.
धोनीने २७५ वन-डे खेळले तर उर्वरित खेळाडू केवळ ८३ वन-डे खेळले आहेत. अंबाती रायुडूने ३१, अक्षर पटेल २२, यांचा अपवाद वगळता अन्य सात खेळाडू केवळ ३० सामने खेळले आहेत. के. एल. राहुलचा अपवाद वगळता अन्य कुणीही युवा खेळाडू कसोटी मालिकेसाठी विंडीज दौऱ्यात नव्हता. मनीष पांडे याला सुरेश रैनाचे स्थान घेण्याची संधी असेल. करुण नायरला देखील अशीच संधी राहील. रायुडूला गेल्या वर्षी द. आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती पण त्याने आत्मविश्वासाअभावी प्रभावी कामगिरी केली नव्हती.
झिम्बाब्वेची समस्या त्यांना सलग खेळायला न मिळणे हीच आहे. वुसीमुजी सिबांडा, एल्टन चिगुम्बुरा, हॅमिल्टन मस्कद्जा, सिकंदर रझा, क्रेग इर्विन आणि सीन विलियम्स हे ओळखीचे चेहरे आहेत. सर्वजण पुरेसे खेळले असल्याने युवा भारतीय संघापुढे ते अडथळा उभा करू शकतात. (वृत्तसंस्था)
>संघ यातून निवडणार
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), के.एल. राहुल, फैज फझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, केदार जाधव, मनदीपसिंग, रिषी धवन, जसप्रीत बुमरा, जयंत यादव, युजवेंद्र चहल, जयदेव उनादकत, धवल कुलकर्णी, अक्षर पटेल.
झिम्बाब्वे : ग्रीम क्रीमर (कर्णधार), तेंदाई चतारा, चामू चिभाभा, एल्टन चिगुम्बुरा, तेंदाई चिसोरो, क्रेग इर्विन, नेविल मादजिवा, टिमीसेन मारुमा, हॅमिल्टन मस्कद्जा, वेलिंग्टन, मस्कद्जा, पीटर मूर, तवांडा मुपारिवा, रिचर्ड मुतुम्बामी (यष्टिरक्षक), तौराई मुजाराबानी, वुसिमुजी सिबांडा, सिकंदर रझा, डोनाल्ड ट्रिपानो, सीन विलियम्स.

Web Title: Dhoni has a new challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.