धोनीला दुखापत
By admin | Published: February 23, 2016 03:17 AM2016-02-23T03:17:59+5:302016-02-23T03:17:59+5:30
आशिया कप स्पर्धा प्रारंभ होण्यास ४८ तासांचा अवधी शिल्लक असताना सोमवारी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सरावादरम्यान पाठीच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास जाणवला
फातुल्ला : आशिया कप स्पर्धा प्रारंभ होण्यास ४८ तासांचा अवधी शिल्लक असताना सोमवारी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सरावादरम्यान पाठीच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास जाणवला. बीसीसीआयने तातडीने यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलला पर्यायी व्यवस्था म्हणून संघासोबत जुळण्यास सांगितले.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, सरावादरम्यान धोनीच्या पाठीला दुखापतीचा त्रास जाणवला. निवड समितीने आशिया कप स्पर्धेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून पार्थिव पटेलची निवड केली. आशिया कप स्पर्धेत भारताला सलामी लढत २४ फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळावी लागणार आहे.
गुजरातचा ३० वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने भारतातर्फे २० कसोटी, ३८ वन-डे आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. २१ फेब्रुवारी २०१२ रोजी तो भारतातर्फे अखेरचा वन-डे सामना खेळला होता. त्याने भारतातर्फे अखेरचा टी-२० सामना ३१ आॅगस्ट २०११ रोजी खेळला होता.
दरम्यान, दुखापतीतून न सावरल्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आशिया कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याच्या स्थानी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ रविवारी बांगलादेशमध्ये डेरेदाखल झाला आणि सोमवारी धोनीच्या दुखापतीचे वृत्त धडकले.
धोनीच्या दुखापतीचे स्वरुप अद्याप स्पष्ट झाले नाही, पण पर्याय म्हणून पार्थिवचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कर्णधाराबाबत जोखिम पत्करता येणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.
धोनीला आशिया कप स्पर्धेत सलामी लढतीत विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. २७ फेब्रुवारी रोजी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी धोनी फिट होईल, अशी आशा आहे.