धोनीकडे युवा संघाचे नेतृत्व

By admin | Published: May 24, 2016 04:30 AM2016-05-24T04:30:38+5:302016-05-24T04:30:38+5:30

आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या युवा खेळाडूंच्या संघाची धुरा महेंद्रसिंह धोनीकडे

Dhoni led the youth team | धोनीकडे युवा संघाचे नेतृत्व

धोनीकडे युवा संघाचे नेतृत्व

Next

मुंबई : आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या युवा खेळाडूंच्या संघाची धुरा महेंद्रसिंह धोनीकडे सोपविण्यात आली आहे, तर दुसरीकडे वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भरवशाच्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी भारताच्या कसोटी संघात मुंबई रणजी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर एकमेव नवा चेहरा असेल.
सोमवारी मुंबईत दोन्ही दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. विदर्भचा युवा फलंदाज फैझ फझलची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात निवड झाली आहे, तर मुंबईकर शार्दुलला विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. जून महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय व तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर जुलै - आॅगस्ट महिन्यात टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यास जाईल.
राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे सचिव अजय शिर्के यांनी निवड समितीच्या बैठकीनंतर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाची घोषणा केली. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ निवडण्यात आला असून एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी एकच संघ ठेवण्यात आला आहे, तर दुसरीकडे विंडीज दौऱ्यासाठी १७ सदस्यांचा भारतीय संघ निवडण्यात आला आहे. विशेष म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या प्रमुख फलंदाजांना झिम्बाब्वे दौऱ्याकरिता विश्रांती देण्यात आली आहे.
फैझ फझल, यजुवेंद्र चहल आणि जयंत यादव हे मर्यादित षटकांच्या संघात नवीन चेहरे असून टी-२० विश्वचषक संघातील खेळाडू आणि यंदाच्या आयपीएलमध्ये साडेआठ करोडची मोठी किंमत मिळवणाऱ्या पवन नेगीला मात्र टी-२० संघातून बाहेर करण्यात आले आहे.

रोहित, जडेजा, पंड्याला विश्रांती
यंदाच्या मोसमात भारतीय संघाला एकूण १७ कसोटी सामने खेळायचे असून निवडकर्त्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या आणि उमेश यादव यांना झिम्बाब्वे दौऱ्याकरिता विश्रांती दिली आहे.
मागील दोन झिम्बाब्वे दौऱ्यात महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली होती. मात्र या वेळी त्याच्याकडे कर्णधारपद असून या दौऱ्यानंतर टीम इंडिया कसोटी सामन्यांत व्यस्त होणार असल्याने धोनीला यादरम्यान मोठी विश्रांती मिळणार आहे.
मर्यादित षटकांच्या संघात लेगस्पिनर यजुवेंद्र चहल, आॅफस्पिनर जयंत यादव, फैझ फझल, मनदीपसिंग आणि करुण नायर यांचा समावेश आहे. तसेच पवन नेगी, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांना टी-२० संघातून व गुरकिरतसिंगला मागील एकदिवसीय संघातून वगळण्यात आले.
जुलै-आॅगस्ट महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात मुंबईकर शार्दूल एकमेव नवा चेहरा आहे. या दौऱ्याकरिता रहाणेला उपकर्णधारपदी निवडण्यात आले असून, वेगवान गोलंदाज मोहंमद शमीनेही पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे मार्च २०१५पासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता.

यंदाच्या आयपीएलमध्ये छाप पाडलेला यजुवेंद्र १९ बळींसह अग्रस्थानी आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून यंदा ११ सामने खेळले आहेत. त्याने एकूण ७७ टी-२० सामन्यांत ८० बळी घेतले आहेत.
विशेष म्हणजे सध्या आयपीएलशी निगडित नसलेला फैझ एकमात्र खेळाडू संघात आहे. फैझने २०११ पर्यंत राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. सध्या तो इंग्लंडमध्ये लीग क्रिकेट खेळत आहे.

निवडण्यात
आलेले
भारतीय
संघ
झिम्बाब्वे दौरा (एकदिवसीय व टी-२०) : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), लोकेश राहुल, फैझ फजल, मनीष पांड्ये, करुण नायर, अंबाती रायुडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मनदीपसिंग, केदार जाधव, जयदेव उनाडकट आणि यजुवेंद्र चहल.
वेस्ट इंडीज दौरा (कसोटी) : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, अमित मिश्रा आणि स्टुअर्ट बिन्नी.

संघ निवडताना समितीने निष्पक्षपातीपणे आपला निर्णय दिला. कोणीही समितीला खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत सुचविले नव्हते. कोणत्याही खेळाडूने बोर्डाला आपल्या उपलब्धतेविषयी कोणत्याही प्रकारे कळवले नव्हते. झिम्बाब्वे आणि विंडीज दौऱ्यासाठी युवा संघ निवडण्यामागे निवड समितीचा स्वत:चा निर्णय होता. धोनी स्वत: युवा खेळाडूंसह झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्यास इच्छुक होता. अशा वेळी धोनीच्या उपस्थितीमध्ये युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल.
- संदीप पाटील,
राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष

काही वर्षांपूर्वी मी रणजी मोसमात ७००हून अधिक धावा काढल्या होत्या, त्या वेळी मला काही खूषखबरींची अपेक्षा होती. मात्र, असे काहीही झाले नाही आणि मी निराश झालो. मी अपेक्षा सोडली होती. वडिलांनी फोन करून ही आनंदाची बातमी कळवली, तेव्हापासून जग खूप सुंदर दिसत आहे. प्रत्येक जण भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहतो. ही संधी मला मिळाल्याचा आनंद आहे.
- फैज फजल

Web Title: Dhoni led the youth team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.