धोनीने अनेकदा बाहेर होण्यापासून वाचवले
By Admin | Published: January 8, 2017 03:44 AM2017-01-08T03:44:13+5:302017-01-08T03:44:13+5:30
महेंद्रसिंग धोनी हा माझ्यासाठी कर्णधार नव्हे तर रक्षणकर्ताही होता. अनेकदा त्याने मला संघाबाहेर होण्यापासून वाचविल्याची कबुली तिन्ही प्रकारातील नवनियुक्त कर्णधार
नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी हा माझ्यासाठी कर्णधार नव्हे तर रक्षणकर्ताही होता. अनेकदा त्याने मला संघाबाहेर होण्यापासून वाचविल्याची कबुली तिन्ही प्रकारातील नवनियुक्त कर्णधार विराट कोहली याने दिली.
२००८ मध्ये कोहलीने श्रीलंकेत पदार्पण केले. तेव्हापासून धोनीच्या नेतृत्वात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या नात्याने खेळला. धोनी माझा मार्गदर्शक राहिला असे सांगून विराट पुढे म्हणाला,‘सुरुवातीच्या अपयशानंतरही धोनीने माझ्यावर विश्वास दाखवित वारंवार संधी दिली. अनेकदा संघाबाहेर होण्यापासून त्यानेच मला वाचविले.’
कर्णधार म्हणून धोनीचे स्थान घेणे अनेकांना शक्य नाही. धोनीची पोकळी भरून काढणे देखील सोपे जाणार नाही. महेंद्रसिंग धोनीचे नाव ओठावर येताच सर्वांत आधी कर्णधार डोळ्यापुढे येतो. कुठल्याही खेळाडूशी त्याची तुलना होऊ शकणार नाही. माझ्यासाठी धोनी नेहमीच कर्णधार राहील, असे विराटने सांगितले.
धोनीने बुधवारी वन डे तसेच टी-२० चे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर निवड समितीने कोहलीकडे तिन्ही प्रकारात नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेत पहिला सामना १५ जानेवारी रोजी पुण्यात खेळला जाईल. (वृत्तसंस्था)
नेतृत्वासाठी सज्ज - कोहली
कसोटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आल्यानंतर आश्चर्यचकित झालेला विराट आता तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार बनण्यासाठी नव्या दमाने सज्ज झाल्याचे दिसत आहे. नेतृत्वगुण शिकल्यामुळे आपण सज्ज असल्याचे कोहलीचे मत आहे.
कसोटीत नेतृत्व कसे करतात हे समजण्यास थोडा वेळ लागला. झटपट क्रिकेटमध्ये कसे नेतृत्व करतात हे मला कळले असल्याने आत्मविश्वास बळावला आहे. मी धोनीची पंरपरा पुढे नेणार असल्याने अवांतर जबाबदारीचा मला निश्चितपणे लाभ होईल. मी गाफिल राहणारा खेळाडू नाही. शिवाय फाजील आत्मविश्वासही बाळगत नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूला तुल्यबळ मानून मी पुढे पाऊल टाकत असल्याने धोनीची विजयी परंपरा पुढे नेण्याचा विश्वास असल्याचे मत विराटने व्यक्त केले.
धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. तो म्हणाला,‘ अॅडिलेड कसोटीच्या एक दिवस आधी धोनी उद्या सामना खेळणार नाही, असे मला सांगण्यात आले होते. मी नेतृत्व करणार हे ऐकून मला आश्चर्य वाटले. पण नवी जबाबदारी मला बरेच शिकवून गेली. कसोटीतील नेतृत्व शानदार राहिल्याने झटपट क्रिकेटमध्ये प्रेरणा मिळेल.’