धोनी, रैना, रहाणे आणि जडेजावर संघांची नजर
By admin | Published: December 15, 2015 01:28 AM2015-12-15T01:28:49+5:302015-12-15T01:28:49+5:30
आयपीएल ड्राफ्टमध्ये दोन नव्या फ्रँचायझी आपापले संघ तयार करण्यास प्रयत्नशील आहेत. मंगळवारी होणाऱ्या आयपीएल ड्राफ्टमध्ये समावेश असलेला भारताचा मर्यादित
मुंबई : आयपीएल ड्राफ्टमध्ये दोन नव्या फ्रँचायझी आपापले संघ तयार करण्यास प्रयत्नशील आहेत. मंगळवारी होणाऱ्या आयपीएल ड्राफ्टमध्ये समावेश असलेला भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार महेंद्रसिंह धोनी व्यतिरिक्त त्याचा सहकारी रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि रविचंद्रन आश्विन यांच्यावर नजर राहणार आहे.
संजीव गोयंकाच्या न्यू रायझिंगने ८ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये झालेल्या रिझर्व्ह बोली प्रक्रियेच्या माध्यमातून पुणे फ्रँचायझी, तर इंटेक्सने राजकोट फ्रँचायझी विकत घेतली. हे दोन संघ २०१६ आणि २०१७ मध्ये निलंबित चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्स यांचे स्थान घेतील. या टी-२० लीगमध्ये दोन नव्या फ्रँचायझी काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा आपापल्या संघांत समावेश करण्यास उत्सुक आहेत. त्यात न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा आॅस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, सध्याचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो यांचा समावेश आहे.
गेल्या मोसमात चेन्नई व रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळजवळ ५० क्रिकेटपटूंचा ड्राफ्टमध्ये समावेश असेल. मुंबई क्रिकेट संघटनेच्या बांद्रा-कुर्ला परिसरात होणाऱ्या ड्राफ्टमध्ये खेळाडू निवडण्याची पहिली संधी पुणे फ्रँचायझीला मिळेल. कारण, त्यांनी दोन वर्षांच्या कालावधीसाठी नवा संघ विकत घेताना सर्वांत कमी किमतीची बोली लावली होती. चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्स या संघांना आयपीएल २०१३ स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्यानंतर दोन नव्या संघांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला. चेन्नई आणि रॉयल्स दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुन्हा लीगमध्ये सहभागी होतील. या दोन निलंबित फ्रँचायझी संघातील खेळाडूंची आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे आणि केवळ स्थानिक क्रिकेट खेळणारे अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल.
त्याचवेळी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला कोणता संघ करारबध्द करणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण, आयपीएलमध्ये प्रथमच राजकोटचा संघ सहभागी होत आहे. त्यामुळे राजकोट आपल्या या स्थानिक खेळाडूला संघात घेण्यास यशस्वी ठरणार का याकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असेल. तसेच नुकताच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केलेला जडेजा महत्त्वपुर्ण खेळाडू बनला आहे. त्यामुळे पुणे संघही त्याच्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. याव्यतिरीक्त टी-२० स्पेशालिस्ट सुरेश रैना, भारताचा प्रमुख फिरकीपटू आर. अश्विन, अजिंक्य रहाणे, ड्वेन ब्राव्हो, धडाकेबाज ब्रँडन मॅक्युलम यांसाठीही राजकोट व पुण्यामध्ये जोरदार स्पर्धा पाहण्यास मिळेल. (वृत्तसंस्था)
जास्तीत जास्त ५ खेळाडू निवडण्याचा पर्याय
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, की दोन्ही नव्या फ्रँचायझींकडे जास्तीत जास्त ५ खेळाडू निवडण्याचा पर्याय राहील. ज्या खेळाडूंना करारबद्ध करण्यात येणार नाही, त्या खेळाडूंना पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावामध्ये स्थान देण्यात येईल. ट्रेडिंग विंडो (दुसऱ्या कुठल्या फ्रँचायझीतर्फे खेळाडूंच्या खरेदीसाठी प्रक्रिया) १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी उपलब्ध राहील.
चेन्नई संघाचे कर्णधारपद भूषवणारा भारताचा टी-२० व विश्वकपविजेता कर्णधार धोनी याची तीच प्रतिमा कायम आहे का? याबाबत उत्सुकता आहे. चेन्नईमध्ये ८ वर्षांपूर्वी खेळाडूंच्या लिलावामध्ये धोनीला मोठ्या रकमेच्या मोबदल्यात करारबद्ध करण्यात आले होते.
बोलीच्या नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझीतर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या पहिल्या खेळाडूसाठी १२.५ कोटी रुपये आणि उर्वरित ४ खेळाडूंना अनुक्रमे ९.५ कोटी, ७.५ कोटी, ५.५ कोटी रुपये आणि ४ कोटी रुपये मिळतील. केवळ स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूची निवड करण्यात आल्यानंतर त्याला ४ कोटी रुपये मिळतील. आयपीएलचे नववे पर्व पुढील वर्षी ९ एप्रिल ते २९ मे या कालावधीत रंगणार आहे.