धोनीकडून नेतृत्वाचे धडे घेत आहे : कोहली
By admin | Published: February 3, 2017 05:00 AM2017-02-03T05:00:50+5:302017-02-03T05:00:50+5:30
‘‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये निर्णय घेण्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ मिळत आहे,’’ अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.
बंगळुरू : ‘‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये निर्णय घेण्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ मिळत आहे,’’ अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदासाठी अद्याप मी नवा आहे, असेही तो म्हणाला.
भारताने बुधवारी रात्री तिसऱ्या व अखेरच्या टी-२० सामन्यात ७५ धावांच्या मोठ्या फरकाने इंग्लंडवर विजय मिळवून टी-२० मालिकेत २-१ ने सरशी साधली.
कोहली म्हणाला, ‘‘मी कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे, पण वन-डे व टी-२० क्रिकेट वेगवान असते. त्यामुळे या प्रकारच्या क्रिकेटमध्ये मोक्याच्या क्षणी धोनीसारख्या व्यक्तीचा सल्ला घेतो. धोनीला अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याला खेळाचे चांगले ज्ञान आहे.’’
विराटने खुलासा केला, की चमकदार कामगिरी करणाऱ्या यजुवेंद्र चहलचा गोलंदाजीचा कोटा संपल्यानंतर मी हार्दिक पंड्याला गोलंदाजीसाठी पाचारण करणार होतो, पण धोनी व आशिष नेहरा यांनी चेंडू जसप्रीत बुमराहकडे सोपविण्याचा सल्ला दिला. त्याने तीन चेंडूंमध्ये दोन बळी घेत सामना संपविला. कोहली पुढे म्हणाला, ‘‘मी कर्णधारपदासाठी नवा नाही, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्यासाठी ज्या प्रकारचे कौशल्य आवश्यक असते ते समजण्यासाठी संतुलन असायला हवे. त्यासाठी महेंद्रसिंह धोनीची मोठी मदत झाली. भारतीय संघाने वेगाने प्रगती केली आहे. संघात अनेक युवा खेळाडू आहेत.’’ आम्हाला अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाले आहेत. तिन्ही मालिका जिंकल्यामुळे समाधान वाटत आहे. (वृत्तसंस्था)
- मधल्या षटकांमध्ये विकेट घेतल्या नाही तर बंगळुरूमध्ये कुठलेही लक्ष्य गाठणे शक्य असते. येथे कुठलेही लक्ष्य मोठे वाटत नाही आणि जगातील कुठलाही फलंदाज झटपट धावा फटकावू शकतो. त्यामुळे या लढतीत मधल्या षटकांमध्ये चहलने बळी घेत आमचे काम सोपे केले. इंग्लंडचा डाव गडगडला असला तरी आयपीएल लिलावामध्ये इंग्लंडच्या खेळाडूंच्या निवडीवर त्याचा कुठलाही प्रभाव पडणार नाही. पाहुण्या संघाने ८ धावांत ८ फलंदाज गमावले. त्यामुळे त्यांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
- विराट कोहली