आयपीएलमध्ये धोनीला कर्णधारपदावरून हटवले

By Admin | Published: February 20, 2017 12:34 AM2017-02-20T00:34:39+5:302017-02-20T00:34:39+5:30

इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल)मधील रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स या संघाने भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला रविवारी अचानक

Dhoni was removed from the captaincy in the IPL | आयपीएलमध्ये धोनीला कर्णधारपदावरून हटवले

आयपीएलमध्ये धोनीला कर्णधारपदावरून हटवले

googlenewsNext

कोलकाता : इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल)मधील रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स या संघाने भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला रविवारी अचानक कर्णधारपदावरून बाजूला केले असून, त्याच्या जागी आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथकडे संघाची धुरा दिली आहे. ही घोषणा संघाचे मालक संजीव गोयंका यांनी केली. हा निर्णय खेळाडूंच्या लिलावाच्या एक दिवस अगोदर घेण्यात आला आहे.
पुणे संघाचे मालक संजीव गोयंका म्हणाले, ‘धोनीने राजीनामा दिला नसून, आम्ही आगामी सत्रासाठी स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्व सोपविले आहे. मागील मोसमाची सांगता झाल्यापासून संघाच्या नेतृत्वात बदल करण्याचा विचार आमच्या मनात घोळत होता. तरुण खेळाडूकडं संघाचं नेतृत्व द्यायचं होतं. आमचा संघ आणखी फक्त एक वर्ष खेळणार आहे. आम्हाला उत्कृष्ट प्रदर्शन करायचं आहे. स्टीव्ह स्मिथ संघात नक्कीच आवश्यक तो बदल घडवून आणेल,' अशी आशा गोयंका यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मी कर्णधार व एक व्यक्ती म्हणून धोनीचा आदर करतो. धोनी यापुढेही आमच्या संघाचा एक भाग असेल.’
चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांवर बंदी आल्यानंतर आयपीएलमध्ये समावेश करण्यात आलेल्या दोन संघापैकी पुणे हा एक संघ आहे. मागील मोसमात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ सातव्या क्रमांकावर राहिला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली पुणे संघाला १४ पैकी फक्त ५ सामने जिंकता आले होते. धोनी स्वत:ही फारशी चमक दाखवू शकला नव्हता. १२ डावांमध्ये एका अर्धशतकासह त्याला केवळ २८४ धावा करता आल्या होत्या.
हा संघ पूर्ण मोसमात जखमी खेळाडूंच्या समस्येने ग्रस्त होता. केविन पीटरसन, फाफ डू प्लेसिस व स्टीव्ह स्मिथ जखमी झाल्याने स्पर्धेबाहेर पडले होते. (वृत्तसंस्था)

२००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलमधील सर्वांत महागड्या खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश होतो. त्याने २००८ ते २०१५ पर्यंत चेन्नई सुपरकिंग्जचे कर्णधारपद सांभाळले. यामध्ये त्याने २०१० व २०११मध्ये चेन्नईला जेतेपद मिळवून दिले. त्याचबरोबर २०१० व २०१४ मध्ये चॅम्पियन्स लीगचे जेतेपदही पटकावले.

Web Title: Dhoni was removed from the captaincy in the IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.