धोनीने चौथ्या क्रमांकावर खेळावे
By admin | Published: March 18, 2016 03:35 AM2016-03-18T03:35:17+5:302016-03-18T03:35:17+5:30
यजमान भारतीय संघाला टी-२० विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या लढतीत ४७ धावांनी पराभव झाल्यानंतर भारतीय फलंदाजीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नवी दिल्ली : यजमान भारतीय संघाला टी-२० विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या लढतीत ४७ धावांनी पराभव झाल्यानंतर भारतीय फलंदाजीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. फलंदाजीची बाजू सावरण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा मतप्रवाह पुढे आला आहे. नागपूरमध्ये धोनीला योग्य साथ लाभली असती तर भारताला विजय मिळवण्याची संधी होती; परंतु आघाडीचे फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाले.
डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरच्या मते, धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तरीही फिनिशरची भूमिका बजावू शकतो. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत धोनीने संघाच्या गरजेनुसार खेळायला हवे, असेही गंभीर म्हणाला.
माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वीच म्हटले होते की, धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली तर भारतासाठी ती हितावह ठरेल. त्याच्यात डावावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता असून, सहकाऱ्यांसह तो डावाला आकार देताना भारताला अधिक सामने जिंकून देऊ शकतो, असेही सेहवागने म्हटले होते. (वृत्तसंस्था)