सिडनी कसोटीपूर्वी मायदेशी परतणार धोनी
By admin | Published: January 2, 2015 02:07 AM2015-01-02T02:07:52+5:302015-01-02T02:07:52+5:30
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा महेंद्रसिंह धोनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी मायदेशी परतू शकतो.
सिडनी : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा महेंद्रसिंह धोनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी मायदेशी परतू शकतो. मेलबर्न कसोटीनंतर धोनीने निवृत्ती जाहीर केली होती आणि तो संघासह सिडनीतही दाखल झाला होता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) धोनी कसोटी संपेपर्यंत थांबेल की नाही, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तानुसार धोनी सिडनी कसोटीपूर्वीच मायदेशी परतणार आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने ‘धोनीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य असून, त्याने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको होती,’ असे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, ‘‘मालिकेच्या मध्यांतरालाच निवृत्ती घेण्याच्या धोनीच्या निर्णयाने मी हैराण आहे. तो मालिका संपल्यानंतरही तसे करू शकला असता.’’ (वृत्तसंस्था)