पहिल्यांदाच विराटच्या नेतृत्वाखाली खेळणार धोनी, युवीचे पुनरागमन
By admin | Published: January 6, 2017 04:27 PM2017-01-06T16:27:59+5:302017-01-06T17:13:45+5:30
महेंद्रसिंग धोनीने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांचे कर्णधारपद सोडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कसोटी कर्णधार विराट कोहलीची भारताच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - महेंद्रसिंग धोनीने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांचे कर्णधारपद सोडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कसोटी कर्णधार विराट कोहलीची भारताच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आणि तीन ट्वेंटी-20 भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला. त्यावेळी विराटच्या कर्णधारपदी निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. या तीन सामन्यांसाठी निवडलेल्या संघात नुकतेच कर्णधारपद सोडणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे धोनी प्रथमच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तसेच युवराज सिंगचेही संघात पुनरागमन झाले आहे.
( 'विराट' अपेक्षांचा भार पेलण्यासाठी कोहली सज्ज )
आज मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आणि तीन ट्वेंटी-20 भारतीय संघ जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के.प्रसाद यांनी निवडलेल्या संघांची घोषणा केली. विराटने कसोटी कर्णधार म्हणून केलेली कामगिरी विचारात घेऊन त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात येत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवराज सिंगने केलेली कामगिरी विचारात घेऊन त्याला संघात पुन्हा स्थान देण्यात आल्याचेही प्रसाद म्हणाले.
भारतीय संघ (एकदिवसीय) : विराट कोहली (कर्णधार), महेंद्र सिंग धोनी, लोकेश राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.
भारतीय संघ (ट्वेंटी-20) : विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मनदीप सिंग, लोकेश राहुल, युवराज सिंग, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, मनीष पांडे, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशीष नेहरा