धोनीचा सल्ला सकारात्मक घेणार
By admin | Published: July 7, 2015 01:22 AM2015-07-07T01:22:46+5:302015-07-07T01:22:58+5:30
भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बांगलादेश दौऱ्यामध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबद्दल टीका करुन सर्वांनाच चक्रावून टाकले होते.
मुंबई : भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बांगलादेश दौऱ्यामध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबद्दल टीका करुन सर्वांनाच चक्रावून टाकले होते. परंतु, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी हंगामी कर्णधार म्हणून निवड झालेल्या अजिंक्य रहाणे याने आपल्या या सिनियर खेळाडूच्या टीकेकडे एक सूचना म्हणून पाहणार असून त्यावर सकारात्मरीत्या खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
१० जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी मंगळवारी पहाटे भारतीय संघ झिम्बाब्वेला रवाना होईल. त्यापूर्वी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार रहाणे याने संवाद साधला. धोनीने माझ्या फलंदाजीविषयी मला फीडबॅक दिला असून त्याकडे मी सकारात्मकरीत्या पाहणार आहे व त्यानुसार मी पुढे जात आहे. बांगलादेश दौरा आता माझ्यासाठी इतिहास झाला असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील, असे रहाणेने सांगितले. तसेच संघामध्ये सिनियर व ज्युनियर खेळाडू असा भेद करण्यात विश्वास नसल्याचे देखील रहाणेने सांगितले. आतापर्यंत भारतासाठी १५ कसोटी, ५५ एकदिवसीय आणि ११ टी-२० सामने खेळलेला रहाणे पुढे म्हणाला की, संघात सिनियर किंवा ज्युनियर असा भेद नसून सर्व खेळाडू समान आहेत. कर्णधार म्हणून माझे स्वतंत्र विचार आहेत. शिवाय संघातील सर्व खेळाडूंना स्वत:च्या क्षमतेवर देखील विश्वास असणे गरजेचे आहे.
हरभजनच्या पुनरागमनाविषयी रहाणेने सांगितले की, त्याने भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याच्या पुनरागमनामुळे मी खूप आनंदी असून जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा निश्चितच त्याच्या अनुभवाचा फायदा घेईन, असे सांगत संघ पूर्णपणे सज्ज असल्याचेही सांगितले.(क्रीडा प्रतिनिधी)
> भारतीय संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, मनिष पांड्ये, अंबाती रायडू, मनोज तिवारी, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, संदीप शर्मा, मोहित शर्मा आणि रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक).
> भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक
१० जुलै - पहिला वन-डे सामना
१२ जुलै - दुसरा वन-डे सामना
१४ जुलै - तिसरा वन-डे सामना
१७ जुलै - पहिला टी-२० सामना
१९ जुलै - दुसरा टी-२० सामना