नामुष्कीजनक विक्रमाकडे धोनीची वाटचाल

By admin | Published: August 11, 2014 02:14 AM2014-08-11T02:14:17+5:302014-08-11T02:14:17+5:30

भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार’ असे बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक कौतुकास्पद विक्रम असले तरी, सध्या त्याची वाटचाल एका नामुष्कीजनक विक्रमाकडे सुरू

Dhoni's approach to the notorious record | नामुष्कीजनक विक्रमाकडे धोनीची वाटचाल

नामुष्कीजनक विक्रमाकडे धोनीची वाटचाल

Next

नवी दिल्ली : ‘भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार’ असे बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक कौतुकास्पद विक्रम असले तरी, सध्या त्याची वाटचाल एका नामुष्कीजनक विक्रमाकडे सुरू आहे. विदेशांमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना त्याच्या नेतृत्वाचा ‘मिडास टच’ बहुतेक वेळा दिसलाच नाही. यामुळे विदेशामध्ये झालेल्या कसोटी सामन्यांतील सर्वाधिक अपयशी कर्णधार बनण्याच्या विक्रमाकडे त्याची वाटचाल सध्या सुरू आहे. या यादीत न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग व विंडीजचा ब्रायन लारा हे माजी कर्णधार संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. या दोघांनी प्रत्येकी १६ कसोटी सामने गमावले आहेत.
यजमान इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ नुकताच मॅँचेस्टर कसोटीत नामुष्कीजनक पद्धतीने पराभूत झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताचा विदेशातील हा १३ वा पराभव ठरला. भारतीय कर्णधारांच्या विदेशातील कामगिरीचा विचार करता, धोनीची कामगिरी सर्वाधिक सुमार ठरते. विदेशात सर्वाधिक अपयशी ठरलेल्या कर्णधारांच्या यादीत श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ यांच्या बरोबरीने धोनी संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
धोनीच्या नेतृत्वात विदेशामध्ये भारत आतापर्यंत २७ कसोटी खेळला आहे. यात ६ सामन्यांत विजय, तर १३ सामन्यांत पराभव पदरी आला. उर्वरित ८ सामने अनिर्णीत सुटले. (वृत्तसंस्था)

Web Title: Dhoni's approach to the notorious record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.