धोनीमुळे कारकिर्दीला कलाटणी मिळाली
By admin | Published: January 12, 2017 01:15 AM2017-01-12T01:15:13+5:302017-01-12T01:15:13+5:30
मर्यादित षटकांच्या सामन्यात डावाला सुरुवात करून घेण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या निर्णयामुळे, करिअरला कलाटणी मिळाल्याचे मत
नवी दिल्ली : मर्यादित षटकांच्या सामन्यात डावाला सुरुवात करून घेण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या निर्णयामुळे, करिअरला कलाटणी मिळाल्याचे मत वन डे क्रिकेटमधील शानदार फलंदाज रोहित शर्मा याने बुधवारी व्यक्त केले.
विशेष मुलाखतीत रोहित म्हणाला, ‘वन डे क्रिकेटमध्ये डावाला सुरुवात करण्याच्या निर्णयाने माझ्या करियरला कलाटणी लाभली. हा निर्णय कर्णधार धोनीचा होता. त्यानंतर, मी उत्कृष्ट फलंदाज बनलो. यामुळे खेळातील बारकावे शिकता आले. परिस्थितीनुसार खेळ करण्यासाठी हवा असलेला संयम शिकलो.’
रोहितने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध स्थानिक मालिकेत प्रथमच डावाची सुरुवात केली. सलामीवीर म्हणून त्याने मालिकेत ८० धावा केल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत स्वत:च्या भूमिकेला न्याय दिला.
धोनीने सलामीवीराची भूमिका बजावण्यास सांगितल्याबद्दल रोहित म्हणाला, ‘धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘तू डावाची सुरुवात करावी, असे मला वाटते. तू कट आणि पूलचे फटके उत्कृष्टपणे मारू शकतो. अपयश आले आणि टीका झाली, तरी खचून जाऊ नकोस.’ त्या वर्षी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार होते. धोनीला त्यादृष्टीने विचार करायचा होता. धोनीची खेळाडूंना ओळखण्याची क्षमता कल्पनेपलीकडची असल्याचे मत शर्मा याने व्यक्त केले.
इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीने माझ्या आत्मविश्वासात भर पडल्याचे सांगून रोहित म्हणाला, ‘पांढऱ्या चेंडूने कुठलाही मारा खेळण्यास मी सज्ज झालो होतो.’ न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेदरम्यान मांसपेशी ताणल्या गेल्यापासून रोहित संघाबाहेर आहे. सध्या तो सराव करीत आहे.
करुण नायरने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक ठोकताच रोहितचे संघातील स्थान धोक्यात येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती. याबाबत विचारताच तो म्हणाला, ‘मी स्वत:ला असुरक्षित समजत नाही. आयुष्यात कसे पुढे जायचे, याची मला माहिती आहे. सत्य असे आहे की, करुणला संधी मिळाली आणि त्याने त्रिशतक ठोकले. त्याचे कौतुक व्हायला हवे. करुण आणि लोकेश राहुल यांनी सुरेख फलंदाजी केली, पण मालिकेत यशाचे श्रेय अश्विन, शमी आणि रवींद्र जडेजा यांना जाते.’
जांघेतील जखमेवर शस्त्रक्रिया होताच, रोहितने आठ आठवडे फिटनेसवर खर्च केले. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दल तो म्हणाला, ‘पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी १२-१४ आठवडे लागतील. याचा अर्थ, आणखी चार ते सहा आठवड्यानंतर मैदानावर येईल. सामान्यपणे नेटमध्ये सराव आणि क्षेत्ररक्षणाला सुरुवात करणार आहे.’ रोहितला स्थानिक सामन्यात खेळणे अनिवार्य आहे. विजय हजारे करंडक सामने या महिनाअखेरीस सुरू होतील. (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलिया मालिकेबद्दल मला माहिती नाही, पण काही सराव सामने खेळावे लागतील. क्लब सामन्यात खेळण्यासाठी एमसीएचीदेखील परवानगी घ्यावी लागेल. दहा वर्षांहून अधिक काळापासून मी क्लब क्रिकेट खेळलो नाही. दुखापतीच्या काळात मी कुटुंबीयांसोबत भरपूर वेळ घालविला आहे. मी कठोर मनाचा असलो, तरी माझी पत्नी रितिका माझ्याहून अधिक कणखर वृत्तीची आहे. मी घरी आलो की, तिच्यासोबत चर्चा करतो. यातून माझ्या आत्मविश्वासात भर पडते.
- रोहित शर्मा