धोनीचा फिटनेस चिंतेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 03:50 AM2016-02-24T03:50:08+5:302016-02-24T03:50:08+5:30

भारतीय संघ पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या विश्व टी-२० स्पर्धेच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात दाखल झाला आहे. बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या

Dhoni's fitness concerns matter | धोनीचा फिटनेस चिंतेचा विषय

धोनीचा फिटनेस चिंतेचा विषय

Next

मिरपूर : भारतीय संघ पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या विश्व टी-२० स्पर्धेच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात दाखल झाला आहे. बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या सलामी लढतीसाठी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे भारतीय संघाचा समतोल बिघडू शकतो.
संघाच्या सराव सत्रादरम्यान धोनीला स्नायूच्या दुखापतीचा त्रास जाणवला. त्यामुळे बीसीसीआयने पर्यायी व्यवस्था म्हणून पार्थिव पटेलला पाचारण केले आहे.
यजमान संघाविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत भारतीय संघासाठी कर्णधाराचा फिटनेस चिंतेचा विषय आहे. बांगलादेश संघामध्ये प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता आहे. विश्व टी-२० स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा
वन-डे ऐवजी टी-२० फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आशियातील संघांना टी-२० क्रिकेटचा सराव मिळणार आहे.
जेतेपदाच्या शर्यतीत सामील असलेल्या भारतीय संघासाठी आशिया कप स्पर्धेतील चमकदार कामगिरी विश्व टी-२० स्पर्धेत सहभागी होताना मनोधैर्य उंचावण्यास सहायक ठरेल.
भारताने यंदा सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यापैकी पाच सामन्यांत भारताने विजय मिळवला. भारताला केवळ पुणे येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता.
भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला, तर भारताला आणखी पाच सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. अशा स्थितीत विश्व टी-२० स्पर्धेपूर्वी भारताला ११ सामने खेळायला मिळतील. भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्या मते हा विश्वकप स्पर्धेच्या तयारीचा एक भाग आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकसंध भासतो, पण खरी परीक्षा आशिया कप स्पर्धेपासून प्रारंभ होणार आहे. कारण या स्पर्धेनंतर भारताच्या टी-२० विश्वकप स्पर्धेच्या तयारीचा समारोप होणार आहे. खेळाडूंना सूर गवसणे महत्त्वाचे आहे. धोनी अ‍ॅण्ड कंपनी सुरुवातीपासून वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता मायदेशात खेळताना बांगलादेश संघ बलाढ्य भासतो. भारतीय कर्णधाराने संघातील सर्व १५ खेळाडूंना ‘मॅच टाईम’ देण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले आहे, पण बांगलादेशविरुद्ध विजयी संघ कायम राखण्याची शक्यता आहे.
भारताची फलंदाजीची बाजू मजबूत भासत आहे. त्यात शिखर धवन व रोहित शर्मा डावाची सुरुवात करतील. आॅस्ट्रेलिया दौऱ्यानंतर तीन आठवड्यांची विश्रांती घेणारा विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर पुनरागमन करणार आहे. भारताचा टी-२० स्पेशालिस्ट सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर, तर त्यानंतर सूर गवसत असल्याचे संकेत देणाऱ्या युवराजचा क्रमांक आहे. टी-२० क्रिकेटचा विचार करता रवींद्र जडेजा व बिग हिटर हार्दिक पंड्या यांच्या समावेशामुळे भारताची फलंदाजीची बाजू अधिक बळकट झाली आहे. रवीचंद्रन आश्विन, आशिष नेहरा व जसप्रीत बुमराह गोलंदाजीचे आक्रमण सांभाळण्यास सक्षम आहेत. बुमराह सोमवारी सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. तो विश्रांती घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, बांगलादेश
संघाची भिस्त मुस्ताफिजुर, तास्किन अहमद व अल अमीन हुसेन या गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. (वृत्तसंस्था)

आशिया कप म्हणजे विश्वकप टी-२०ची पूर्वतयारी : कोहली
बुधवारपासून प्रारंभ होणारी आशिया कप स्पर्धा म्हणजे पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वकप टी-२० स्पर्धेची पूर्वतयारी आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने संघातील शक्तिस्थळे व कमकुवत बाजू यांचे आकलन करण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ बुधवारी सलामीला बांगलादेशाविरुद्ध खेळणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, ‘‘विश्वकप स्पर्धेपूर्वी येथील परिस्थिती जवळजवळ सारखी आहे. आम्हाला विश्वकप स्पर्धेत कुठल्या तरी टप्प्यावर या संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विश्वकप स्पर्धेपूर्वी सामने खेळण्याची संधी मिळाल्यामुळे संघाची स्थिती जाणून घेता येईल.’’ कोहली पुढे म्हणाला, ‘‘आशिया कप स्पर्धा सुरुवातीपासून आव्हानात्मक ठरली आहे. उपखंडातील संघांचा विचार करता ही छोटी स्पर्धा आहे.

मुस्तफिजूरचे आव्हान पेलणे सोपे नाही : मुर्तजा
भारताचा फलंदाजी क्रम जगातील सर्वोत्तम फलंदाजी क्रमांपैकी एक आहे; पण आमचा स्टार गोलंदाज मुस्तफिजूर रहमान पाहुण्या संघातील फलंदाजांना आव्हान देण्यास सक्षम आहे, असे मत बांगलादेश संघाचा कर्णधार मशरफी मुर्तजाने व्यक्त केले.
मुर्तजा म्हणाला, ‘‘मुस्तफिजूरच्या स्लो कटर चेंडूंमध्ये विविधता आहे. या चेंडूचा वापर करण्याचा त्याच्यामध्ये किती विश्वास आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. मी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर लक्ष केंद्रित न करता सर्वोत्तम कामगिरी कशी करता येईल, यावर लक्ष देतो. मुस्तफिजूरच्या माऱ्याला कसे सामोरे जायचे, याची तुम्ही तयारी करू शकता; पण त्यात यश येण्याची शक्यता कमी आहे.’’ टी-२०मध्ये आमची कामगिरी विशेष चांगली नाही; पण त्यात सुधारणा करण्याची क्षमता आहे, असेही मुर्तजा म्हणाला.

प्रतिस्पर्धी संघ
भारत :-
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, आशिष नेहरा, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, पवन नेगी आणि पार्थिव पटेल.

बांगलादेश :-
मशरफी मुर्तजा (कर्णधार), इमरुल कायेस, नुरुल हसन, सौम्या सरकार, नासिर हुसेन, शब्बीर रहमान, महमुदुल्ला रियाध, मुश्फिकर रहीम, शकीबुल हसन, अल अमीन हुसेन, तास्किन अहमद, मुस्ताफिजुर रहमान, अबू हीदर, मोहम्मद मिथून, अराफत सन्नी.

सामन्याची वेळ
भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ पासून.

स्थळ
शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, मिरपूर

या दोन्ही संघांमध्ये जून २००९ व मार्च २०१४ रोजी फक्त २ टी-२० सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत.

Web Title: Dhoni's fitness concerns matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.