धोनीचे इंग्लंडविरुद्ध झेलांचे अर्धशतक
By admin | Published: July 19, 2014 01:56 AM2014-07-19T01:56:57+5:302014-07-19T01:56:57+5:30
भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने लॉर्ड्स कसोटीत शुक्रवारी इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकचा झेल घेऊन इंग्लंडविरुद्ध झेलांचे अर्धशतक पूर्ण केले
लंडन : भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने लॉर्ड्स कसोटीत शुक्रवारी इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकचा झेल घेऊन इंग्लंडविरुद्ध झेलांचे अर्धशतक पूर्ण केले. कुठल्याही एका देशाविरुद्ध ५० किंवा त्यापेक्षा अधिक झेल टिपण्याची कामगिरी करणारा धोनी भारताचा पहिला यष्टिरक्षक ठरला.
कारकिर्दीतील ८५वा कसोटी सामना खेळणाऱ्या धोनीने त्यानंतर सॅम रोबसनचा झेल घेऊन भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. रोबसन धोनीचा इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातील ५५वा बळी ठरला. धोनीने इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक अॅलन नॉटचा ५४ बळींचा विक्रम मोडला. रोबसनला बाद करेपर्यंत धोनीने इंग्लंडविरुद्ध ५१ झेल व ४ यष्टिचित, असे एकूण ५५ बळी घेतले आहेत. इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम आॅस्ट्रेलियाच्या रोडनी मार्शच्या (१४१ झेल) नावावर आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा इयान हिली (१२३) आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर (१०३) यांचा क्रमांक लागतो. (वृत्तसंस्था)