कर्णधार म्हणून धोनीचा आजचा शेवटचा सामना
By admin | Published: January 10, 2017 01:58 AM2017-01-10T01:58:01+5:302017-01-10T07:48:50+5:30
ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज, मंगळवारी होणाऱ्या भारत ‘अ’ विरुद्ध इंग्लंड इलेव्हन संघातील एकदिवसीय सराव सामना क्रिकेटप्रेमींसाठी
मुंबई : ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज, मंगळवारी होणाऱ्या भारत ‘अ’ विरुद्ध इंग्लंड इलेव्हन संघातील एकदिवसीय सराव सामना क्रिकेटप्रेमींसाठी विशेष ठरणार आहे. हा एक सर्वसामान्य सराव सामना असला तरी, कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी या सामन्यातून भारतीय संघाचे अखेरचे नेतृत्व करेल. त्यामुळेच या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.
नुकताच भारतीय क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर धोनी पहिल्यांदाच खेळणार असून, भारतीय संघाचे तो शेवटचे नेतृत्व करेल. त्याचवेळी या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता असली तरी कडक पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असल्याने मोजक्याच क्रिकेटप्रेमींना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या दणक्यानंतर अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. त्याचबरोबर अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता पकडावा लागला. या मोठ्या घटनेनंतर होणारा हा पहिलाच सामना आहे. शिवाय मिळालेल्या माहितीनुसार, बोर्ड बाहेर गेलेल्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्याबाबत आपण असमर्थ असल्याचे कळविण्याबाबत बीसीसीआय मान्यताप्राप्त संघटनांना विनंती केली. त्याचप्रमाणे, सध्यातरी मुंबईत होणाऱ्या दोन्ही सराव सामन्यांवर कोणतेही काळे ढग नाहीत.
आज, मंगळवारी होणाऱ्या पहिल्या सराव सामन्यात कर्णधार धोनीशिवाय, स्टार अष्टपैलू युवराज सिंग, वेगवान गोलंदाज आशिष नेहरा या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर प्रमुख लक्ष असेल. या तिन्ही प्रमुख खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी सराव म्हणून हा एकमेव सामना खेळण्याची संधी आहे.
दुसरीकडे या सामन्यातून इंग्लिश खेळाडूही स्वत:ला आजमावतील. कर्णधार इओन मॉर्गनसह अॅलेक्स हेल्स, जेसनराय आणि डेव्हीड विली आॅस्टे्रलियात सुरूअसलेल्या बिग बॅश टी-२० लीगमधील आपआपल्या संघातून भारत दौऱ्यावर आले आहेत, तर जो रुट १२ जानेवारीपासून संघात सहभागी होईल. रुटने वैयक्तिक कारणामुळे मायदेशी थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ‘अ’ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मनदीप सिंग, अंबाती रायडू, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, आशिष नेहरा, मोहित शर्मा आणि सिद्धार्थ कौल.
इंग्लंड इलेव्हन : इआॅन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टॉ, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, लियाम डासन, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, जेसन राय, बेन स्टोक्स, डेव्हीड विली आणि ख्रिस वोक्स.
स्थळ : बेबॉर्न स्टेडियम मुंबई ४वेळ दुपारी १. ३0 वाजता