धोनीसेनेचे पॅकअप..!
By admin | Published: March 27, 2015 01:49 AM2015-03-27T01:49:05+5:302015-03-27T01:49:05+5:30
टीम इंडियाचे सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते बनण्याचे स्वप्न पायदळी तुडवीत आॅस्ट्रेलियाने गुरुवारी दुसऱ्या उपांत्य सामन्यात ९५ धावांनी दणदणीत विजयासह अंतिम फेरीत धडक दिली.
सिडनी : टीम इंडियाचे सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते बनण्याचे स्वप्न पायदळी तुडवीत आॅस्ट्रेलियाने गुरुवारी दुसऱ्या उपांत्य सामन्यात ९५ धावांनी दणदणीत विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. विश्वविजेतेपदासाठी आता आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात मेलबोर्न मैदानावर येत्या रविवारी (दि.२९)अंतिम सामना रंगणार आहे.
स्टीव्हन स्मिथच्या शतकी दणक्यामुळे चार वेळचा विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेत ७ बाद ३२८ पर्यंत मजल गाठली. भारतीय संघ मात्र ४६.५ षटकांत २३३ धावांत गारद झाला. सलग सात सामन्यांत विजयी धडाका दाखविणारे भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले; शिवाय प्रत्येक सामन्यात १० गडी बाद करणारी भारतीय गोलंदाजीही निष्प्रभ राहिली. सर्वाधिक निराश केले ते विराट कोहलीने! कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने ६५ चेंडू टोलवून ६५ धावा केल्या. विजय हातून निसटल्यामुळे त्याची झुंज एकाकी ठरली.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ३०० वर धावा काढणारा आॅस्ट्रेलिया पहिला संघ ठरला. २०११ साली भारताने स्वत:च्या यजमानपदाखाली विश्वचषक जिंकला होता. यंदा न्यूझीलंड-आॅस्ट्रेलिया हे दोन्ही यजमान- सहयजमान असल्याने विश्वचषक यजमानांकडे राहण्याची ही दुसरी वेळ असेल. २८ वर्षांत प्रथमच आशियाई संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणार नाही. आॅस्ट्रेलियाने मात्र सेमीफायनल जिंकण्याचा १०० टक्के रेकॉर्ड कायम ठेवला. आॅस्ट्रेलियाकडून स्मिथने केवळ ९३ चेंडंत ११ चौकार आणि २ षटकारांसह १०५ व अॅरोन फिंचने १११ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह ८४ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ३१ षटकांत १८२ धावांची अमूल्य भागीदारी केली. पाठोपाठ मिशेल जॉन्सन याने चार चौकार व एक षटकार ठोकून २७ धावांसह संघाला ३२८ पर्यंत नेले. भारताची गोलंदाजी पहिल्यांदा महागडी ठरली. उमेश यादवने चार बळी घेतले, पण त्यासाठी ७२ धावा मोजल्या. मोहम्मद शमी याने १० षटकांत ६८ आणि मोहित शर्माने १० षटकांत ७५ धावा दिल्या. अश्विनने १० षटकांत ४२ धावा देत मॅक्सवेलला बाद केले. मॅक्सवेल खेळपट्टीवर असता, तर आॅस्ट्रेलियासाठी ३५० धावा कठीण नव्हत्या.
आॅस्ट्रेलियाच्या डावाचे आकर्षण ठरली ती स्मिथची खेळी. त्याने अर्धशतक आणि नंतर शतक कधी गाठले याचा वेध घेणे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कठीण झाले होते. यामुळे स्टेडियममध्ये निळ्या टी -शर्टमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यांवरील चिंतेचे भाव गडद होत गेले. स्मिथनंतर मॅक्सवेलने ताबा घेतला तो स्थिरवण्याआधीच अश्विनने त्याचा ‘गेम’ केला. शेन वाटसन २८, जेम्स फॉल्कनर २१ यांनी काही धावांची भर घातली. अखेरच्या दहा षटकांत ८७ धावा निघाल्या. विजयासाठी ३२९ धावांचे ओझे घेऊन खेळणाऱ्या भारताची सुरुवात तर चांगली झाली, पण मधल्या फळीने दगा दिला. (वृत्तसंस्था)
या स्पर्धेतील गेल्या सात लढतींमध्ये भारताने विरुद्ध संघाचे सर्व गडी बाद केले होते. पण आज आॅस्ट्रेलियाने भारतीय संघाला सर्व बाद केले.
अखेर पूर्ण दौऱ्यातच आॅस्ट्रेलियाला
पराभूत करण्यात भारताला अपयश
गत चार महिन्यांपासून आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला भारतीय क्रिकेट संघ यादरम्यान यजमान संघाला पराभूत करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि गुरुवारी येथे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ही पराभवाची मालिका कायम राहिली. उपांत्य फेरी गाठण्याआधी भारताने सर्वच्या सर्व सामने दिमाखात जिंकले होते; परंतु आॅस्ट्रेलियाने त्यांना पुन्हा ९५ धावांनी पराभूत करीत त्यांचे दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंग केले.
आॅस्ट्रेलियाच्या गत उपांत्य लढती
२०१५ : भारताचा ९५ धावांनी पराभव
२००६-०७ :दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेटने पराभव
२००२-०३ : श्रीलंकेचा ४८ धावांनी पराभव
१९९९ : द. आफ्रिकेविरुद्धचा सामना टाय झाला होता. आॅस्ट्रेलिया अंतिम फेरीत गेली होती.
१९९५-९६ : वेस्ट इंडीजचा ५ धावांनी पराभव
१९८७-८८ : पाकिस्तानचा १८ धावांनी पराभव
१९७५ : इंग्लंडचा ४ विकेटने पराभव
चाहत्यांचा संताप
आॅस्ट्रेलियाविरूद्ध पराभव पत्करल्यानंतर भारतामध्ये क्रिकेट चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला.
पराभवाच्या वेदना
बोचऱ्या - सचिन
नवी दिल्ली : या पराभवाच्या वेदना बोचऱ्या असल्याचे सचिनने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. भारतीय संघाच्या एकूण कामगिरीचे कौतुक करीत सचिन म्हणाला, ‘‘भारतीय संघाची कामगिरी चांगलीच होती. ब्रॅन्ड अॅम्बेसेडर या नात्याने मीदेखील सामन्यांचा आनंद लुटला. आॅस्ट्रेलियाविरुद्धचा आजचा सामना मात्र भारतासाठी कठीण होता. पराभवाचे शल्य अनेक दिवस कायम राहते.’’ आॅस्ट्रेलियाचे विजयाबद्दल अभिनंदन करीत सचिनने शतकवीर स्टीव्हन स्मिथची पाठ थोपटली. स्मिथचे शतक आणि जॉन्सनची अखेरच्या टप्प्यातील खेळी सामन्यात निर्णायक ठरल्याचे सचिनचे मत आहे.
आॅस्ट्रेलिया हकदार!
‘‘भारतासाठी ही स्पर्धा चांगलीच ठरली. मी खेळाडूंच्या वेदना समजू शकतो. त्यांच्या दु:खात सहभागी आहे. पण आॅस्ट्रेलिया अंतिम सामन्याचा हकदार होता.’’ -युवराजसिंग .
व्हीव्हीएस लक्ष्मणने टिष्ट्वट...
‘भारत उपांत्य फेरीत पराभूत झाला तरी त्यांनी विश्वचषकात सुरुवातीपासून जी कामगिरी केली त्याचा त्यांना अभिमान वाटायला हवा. आॅस्ट्रेलिया संघ आज तुल्यबळ संघ होता.’
आमिर खान म्हणाला...
‘आॅस्ट्रेलिया खूप चांगला खेळला. भारतीय संघाचे आभार. त्यांनी आम्हाला सेमीफायनलपर्यंत नेले. टीम इंडियाला नशिबाची साथ नव्हती.’
अभिनव बिंद्राने लिहिले...
‘खेळ असाच असतो. विश्वचषकातील शानदार आणि साहसी खेळासाठी शाबास टीम इंडिया.’ आॅस्ट्रेलिया अंतिम सामन्यात रविवारी न्यूझीलंड संघाविरुद्ध दोन हात करील.
१३ चा आकडा अशुभ!
भारताला १३ चा आकडा सिडनी मैदानावर अशुभ ठरला आहे. या मैदानावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध सेमिफायनलपूर्वी १३ सामने खेळले होते. आज भारताचा आॅस्ट्रेलियाकडून या मैदानावर १३ वा पराभव झाला. २००८ साली भारताने या मैदानावर एकमेव विजय नोंदविला होता. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याबाबत सांगायचे झाल्यास आॅस्ट्रेलियाने अद्याप एकही उपांत्य सामना गमावलेला नाही. भारताने जे सहा उपांत्य सामने खेळले त्यातील तीन सामन्यांत विजय मिळविला आहे.
निवृत्ती स्वीकारण्यालायक म्हातारा नाही - कर्णधार धोनी
उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताचे विश्वविजतेपद कायम राखण्याचे स्वप्न भंगले. पराभवानंतर प्रतिक्रिया देताना
कर्णधार महेंद्रसिंह
धोनीने निवृत्तीच्या वृत्ताचे खंडन केले. निवृत्ती स्वीकारण्यालायक म्हातारा नाही, असे धोनी म्हणाला. विश्वकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आगेकूच करणाऱ्या टीम इंडियाचा विजयरथ उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाने रोखला.
आॅस्ट्रेलियाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य लढतीत भारताचा ९५ धावांनी पराभव केला. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत धोनीला निवृत्तीबाबत विचारले असता, त्याने गमतीने उत्तर देताना म्हटले, की निवृत्ती स्वीकारण्यालायक अद्याप म्हातारा झालेलो नाही. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर धोनी वन-डे क्रिकेटमधूनही निवृत्ती स्वीकारणार असल्याची चर्चा होती.
धोनीची ही अखेरची विश्वकप स्पर्धा असल्याचे मानले जात होते. पुढील विश्वकप स्पर्धेबाबत बोलताना धोनी म्हणाला,‘‘सध्या मी ३३ वर्षांचा असून, फिट आहे. पण, टी-२० विश्वकप स्पर्धेनंतर २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वकप स्पर्धेबाबत निर्णय घेता येईल.
सिडनीमध्ये शानदार कामगिरीची परंपरा कायम राखल्यामुळे आनंद झाला असून, भारताला गुरुवारी विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत करीत अंतिम फेरी गाठल्यामुळे अभिमान वाटतो.
- क्लार्क
संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्यामुळे आनंद झाला. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी योजनाबद्ध मारा केला. स्टिव्हन स्मिथने शानदार खेळी केली. अनेक खेळाडूंनी या लढतीत सर्वस्व झोकून दिले.
सांघिक कामगिरीमुळे विजय शक्य झाला. साखळी फेरीत आम्हाला न्यूझीलंडविरुद्ध स्वीकारावा लागलेला पराभव आमच्यासाठी धक्का होता. त्यानंतर सर्व खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सुधारणा केली.
आम्ही कामगिरी सुधारण्यासाठी मेहनत घेतली व त्याचा आम्हाला लाभ झाला. अंतिम फेरी गाठल्यामुळे आनंद झाला. न्यूझीलंडविरुद्धची अंतिम लढत सोपी नसल्याची कल्पना आहे. शुक्रवारी आम्ही मेलबोर्नला रवाना होणार असून, विश्रांतीनंतर सरावाबाबत विचार करू.’’