धोनीचा हैदराबादला तडाखा
By admin | Published: April 23, 2017 02:53 AM2017-04-23T02:53:52+5:302017-04-23T02:53:52+5:30
जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने ऐन मोक्याच्या वेळी खेळ उंचावत शेवटच्या चेंडूवर चौकार मारत पुणे सुपरजायंट्सला विजय
- संतोष मोरबाळे, पुणे
जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने ऐन मोक्याच्या वेळी खेळ उंचावत शेवटच्या चेंडूवर चौकार मारत पुणे सुपरजायंट्सला विजय मिळवून दिला. धोेनीने तीन षटकार व चार चौकारांच्या साह्याने ५५ धावा केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता ताणल्या गेलेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी दोन धावांची गरज असताना धोनीने चौकार मारत सामना आपल्या बाजूने वळवला. पुणे सुपरजायंट्सने चार गड्यांच्या मोबदल्यात २० षटकांत १७९ धावा केल्या.
हैदराबादच्या १७६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पुणे सुपरजायंट्सची सुरुवात काहीशी डळमळीतच झाली. बिपुल शर्माने पुण्याचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे (२) याला स्वस्तात बाद करत पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर कर्णधार स्मिथ व राहुल त्रिपाठी याने पुण्याचा डाव सावरला. यातही त्रिपाठीने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक साजरे केले. पाचव्या षटकात मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत त्याने ३१ चेंडंूत अर्धशतक झळकावले. एका बाजूला त्रिपाठीने आक्रमक पवित्रा घेतला होता, तर दुसऱ्या बाजूला स्मिथ संयमी फलंदाजी करत होता. मात्र रशिद खानने दहाव्या षटकांत स्मिथचा अडथळा दूर केला. स्मिथने दोन षटकार व एका चौकाराच्या साह्याने २१ चेंडूंत २७ धावा केल्या. चौदाव्या षटकात एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात राशिद खान याने केलेल्या थ्रोवर त्रिपाठी धावबाद झाला. त्याने ४१ चेंडूंत तीन षटकार, सहा चौकारांच्या साह्याने ५९ धावा केल्या. जिंकण्यासाठी आवश्यक धावा व चेंडूचे गणित वाढल्यामुळे सर्व अपेक्षा धोनीवरच होत्या. चौदाव्या षटकात षटकार मारत ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या दोन चेंडूंत ३ धावा आवश्यक असताना धोनीने अठराव्या षटकात दोन चौकार व षटकार लगावले. भुवनेश्वरच्या या षटकात तिवारी व धोनीने १९ धावा करीत विजय आवाक्यात आणला. शेवटच्या षटकात पुण्याला विजयासाठी अकरा धावांची गरज होती. मनोज तिवारीने पहिल्याच चेंडूवर चौकार
मारत विजय आवाक्यात आणला. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना धोनीने चौकार मारत विजय मिळवून दिला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाने ३ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली होती.
संक्षिप्त धावफलक
हैदराबाद सनरायजर्स : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. उनाडकट ५५, शिखर धवन झे. त्रिपाठी गो. ताहिर ३०, केन विल्यम्सन पायचित गो. ख्रिस्तियन २१, हेन्रिक्स नाबाद ५५, दीपक हुडा नाबाद १९, अवांतर ८, एकूण : २० षटकांत ३ बाद १७६. गोलंदाजी जयदेव उनाडकट ४-०-४१-३, सुंदर वॉशिंग्टन ३-०-१९-२, बेन स्टोक्स २-०-१९-१, इम्रान ताहिर ३-०-२३-१ ख्रिस्तियन ४-०-२०-१.
पुणे सुपरजायंट्स : अजिंक्य रहाणे झे. कौल गो. शर्मा ७, राहुल त्रिपाठी धावबाद ५९, स्मिथ त्रिफळा गो. राशिद खान २७, धोनी नाबाद ६१, तिवारी नाबाद १७. अवांतर ३ एकूण : २० षटकांत १७९. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-३९-१, राशिद खान ४-०-१७-१, शर्मा ४-०-३०-१.