'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने पुन्हा इतिहास रचला! वर्ल्ड लीडसह जिंकली डायमंड लीग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 11:21 PM2023-05-05T23:21:01+5:302023-05-05T23:22:22+5:30
भारताचा 'गोल्डन बॉय' ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) ने दोहा येथे झालेल्या डायमंड लीग ( Diamond League) मध्ये भालाफेकीतील जेतेपद कायम राखले.
भारताचा 'गोल्डन बॉय' ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) ने दोहा येथे झालेल्या डायमंड लीग ( Diamond League) मध्ये भालाफेकीतील जेतेपद कायम राखले. पहिल्याच प्रयत्नात फेकलेला ८८.६७ मीटर लांब भाला, त्याला डायमंड लीग जिंकण्यासाठी पुरेसा ठरला.
गतविजेत्या नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेक करताना ग्रेनाडाचा पीटर अँडरसन व झेक प्रजासत्ताकचा व्हॅल्देच याकुब या कट्टर स्पर्धकांना मागे ठेवले. दुसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजचा भाला ८६.०४ मीटर लांब जाऊ शकला, परंतु तो अव्वल स्थानावरच होता. तिसऱ्या प्रयत्नात नीरजचा भाला आणखी कमी दूर गेला अन् त्याला ८५.४७ मीटर भालाफेक केली. दुसऱ्या प्रयत्नात याकुब ८८.६३ मीटर भालाफेक करून नीरजच्या जवळ पोहोचला होता. पण, अजूनही नीरज हा वर्ल्ड लीडसह आघाडीवरच होता.
At the half way mark, Neeraj Chopra is still leading the line with 88.67m. 🇮🇳
— Inspire Institute of Sport (@IIS_Vijayanagar) May 5, 2023
Jakub Vadlejch 🇨🇿 sits second with a best throw of 88.63m. 👀
Anderson Peters 🇬🇩 holds the third position with a best throw of 85.88m. #DohaDL#DiamondLeague#NeerajChopra#CraftingVictories 🇮🇳 pic.twitter.com/UFsCRojOyM
नीरजचा चौथा प्रयत्न फाऊल ठरला आणि पाचव्या प्रयत्नात ८४.३७ मीटर भालाफेक झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सर्व स्पर्धकांना अडचण होत होती. सहाव्या प्रयत्नात नीरजला ८६.५२ मीटर लांब भालाफेकता आला आणि तो या प्रयत्नाने काहीसा निराश दिसला. ९० मीटर लांब भालाफेकीसाठी त्याला आणखी प्रतीक्षा व प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याला टक्कर देणाऱ्या जाकुबला ८४.७६ मीटर भालाफेकता आल्याने नीरजचे जेतेपद निश्चित झाले.
९ सप्टेंबर २०२२ मध्ये नीरजने इतिहास रचला होता. मानाची डायमंड ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. डायमंड लीगमध्ये नीरजनं ८८.४४ मीटर दूरवर भालाफेक करत विजयाची नोंद केली. नीरजने २०२१मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला होता. त्याआधी २०१८ मधील आशिया स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही नीरजने सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०२२ जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरजने रौप्य पदक मिळवलं होतं.