डिकॉक, अमलाला रोखणे आवश्यक

By admin | Published: June 11, 2017 12:35 AM2017-06-11T00:35:30+5:302017-06-11T00:35:30+5:30

श्री लंकेने भारताच्या विशाल धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत साखळी फेरीतील अखेरच्या दोन दिवसांमध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतींमध्ये

Dicoc, the staff must stop | डिकॉक, अमलाला रोखणे आवश्यक

डिकॉक, अमलाला रोखणे आवश्यक

Next

- सुनील गावस्कर लिहितात...

श्री लंकेने भारताच्या विशाल धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत साखळी फेरीतील अखेरच्या दोन दिवसांमध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतींमध्ये रंगत निर्माण झाली. भारत-दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान-श्रीलंका यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेते संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे खेळाडूंवर मोठे दडपण येते. यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला प्रगल्भता आली असल्याचे सिद्ध करण्याची संधी आहे. आता चोकर्स नसल्याचे सिद्ध करण्यास दक्षिण आफ्रिका संघ प्रयत्नशील आहे. यापूर्वीचा अनुभव बघता दक्षिण आफ्रिका संघ साखळी फेरीत उत्तम कामगिरी करीत असल्याचे दिसून आले. खेळाडूंना यानंतरही संधी असल्याची कल्पना असल्यामुळे साखळी फेरीत त्यांची कामगिरी विशेष बहरते, पण बाद फेरीत मात्र त्यांची कामगिरी ढेपाळते.
वैयक्तिक कामगिरीचा विचार करता काही दक्षिण आफ्रिकन खेळाडूंची जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणणा होते.
क्विंटन डिकॉकची वन-डे क्रिकेटमध्ये भारताविरुद्धची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. भारताविरुद्ध तो शतकी खेळी करण्यास उत्सुक असेल. फॅफ ड्यूप्लेसिस फॉर्मात असून त्याच्या जोडीला ३६० डिग्रीमध्ये फलंदाजी करण्याची क्षमता असलेला एबी डिव्हिलियर्स आहे. हे खेळाडू सामन्याचे चित्र पालटण्यास सक्षम आहेत. यासोबत शांतचित्ताने फलंदाजी करणारा हाशिम अमला आहेच.
अमला आधुनिक फलंदाजांप्रमाणे आक्रमक नाही. त्याने शतक झळकावले तरी त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तो मैदानावर जल्लोष करणार नाही. तो आपले हेल्मेट काढेल आणि बॅट उंचावत स्मित हास्यासह प्रेक्षकांच्या अभिवादनाचा स्वीकार करेल. त्यानंतर तो काही विशेष पराक्रम केला नसल्याप्रमाणे शांतचित्ताने पुन्हा हेल्मेट घालत फलंदाजीला सुरुवात करेल. अमला व डिकॉक यांची सलामीची जोडी शानदार आहे. विशेष चर्चेत न राहता ते आपल्या फलंदाजीवर प्रेम करीत असतात. कुठल्याही प्रकारचा अतिउत्साह न दाखविता हे दोघेही चेंडूंना सीमारेषा दाखवित वेगाने धावा फटकावित असतात. प्रतिस्पर्धी संघ ज्यावेळी धावफलकाकडे बघतो त्यावेळी या जोडीने वेगाने शतकी भागीदारी नोंदविलेली असते.
दक्षिण आफ्रिकेच्या अन्य खेळाडूंबाबत विचार करण्यापेक्षा भारतीय संघाने या दोघांबाबत चिंता बाळगणे आवश्यक आहे. या दोघांच्या फॉर्मचा विचार करता अन्य खेळाडूंना फार अधिक षटके फलंदाजी करण्याची संधी मिळणार नाही. ओव्हलची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असेल तर भारतीय गोलंदाजांची स्थिती पुन्हा एकदा श्रीलंकेविरुद्धच्या लढतीप्रमाणे होईल. खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अधिक उसळी मिळत असेल तर रबादा, मोर्कल वर्चस्व गाजवू शकतात.
सराव सामन्यांपासूनच भारतीय फलंदाज फॉर्मात असल्याचे दिसून आले आहे. साखळी फेरीतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यामुळे भारतीय संघाची लक्ष्याचा बचाव करण्यापेक्षा लक्ष्याचा पाठलाग करण्यास पसंती राहील. इंग्लंडमधील वातावरण सुधारत आहे, पण कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील त्यावेळी लहरी वातावरणात डकवर्थ/लुईस नियमचा विचारही त्यांच्या डोक्यात असेल. त्यामुळे प्रत्येक बाबीमध्ये वर्चस्व गाजवणारा संघ सरशी साधेल हे निश्चित. (पीएमजी)

Web Title: Dicoc, the staff must stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.